दुध संघात एकदम ओके. . .म्हणूनच टपलेत सारे बोके !

जिल्हा दुध संघात असे आहे तरी काय की मंत्री व आमदारांपासून ते पदाधिकारी इतके दंड थोपटत आहेत ? असा प्रश्‍न तमाम जिल्हावासियांना पडणे स्वाभाविक आहे. खरं तर सहकारात दुसर्‍या फळीतील नेत्यांना प्राधान्य अपेक्षित असतांना उच्च पदे असणार्‍यांनाही याचा मोह का पडावा ? याचे उत्तर शोधायचे असेल तर आपल्याला यातील अर्थकारण समजून घ्यावे लागेल. हीच बाब आपल्याला सामाजिक कार्यकर्ते अशोकदादा शिंदे सहजसोप्या शब्दांमध्ये सांगत आहेत. अर्थात, हे वाचून आपणही म्हणाल-दुध संघात एकदम ओके. . .म्हणूनच टपलेत सारे बोके !

छत्रपती शिवाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अशोकदादा शिंदे यांनी जळगाव जिल्हा दुध संघातील सध्या सुरू असलेल्या घडामोडींबाबत केलेले भाष्य हे आम्ही आपल्याला जसेच्या तसे सादर करत आहोत.

राजकारण्यांनी पोखरला जळगाव दूध संघाचा विकास!

काल जिल्हा दूध संघाच्या कार्यकारी संचालकाला कोट्यावधीच्या भ्रष्टाचार प्रकरणी अटक झाल्याची बातमी प्रसिद्ध झाली. तसा या भ्रष्टाचाराचा आवाका पाहिल्यास हे हिमनगाच एक छोटसं टोक आहे अशी जनमानसात चर्चा आहे. जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघ १९७१ साली अस्तीत्वात आला. शेतकर्‍यांना शेतीपूरक असा व्यवसाय असलेल्या पशुपालनाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय मिळावा त्यातून येणार्‍या उत्पन्नातून शेतकरी सक्षम व्हावा या अत्यंत उदात्त हेतूने सुरू झालेला हा दूध संघ १९८० पर्यंत सक्षमपणे कार्यरत राहिला. किमान आठशे ते साडेआठशे गावांमध्ये दूध उत्पादक सोसायटी निर्माण झाल्या. महत्त्वाच्या ठिकाणी दूध संकलन केंद्रे उभी राहिली लाखो लिटर दूध दूध संघात येऊ लागले. शेतकर्‍यांची आर्थिक सक्षमता वाढली. दूध संघात मोठी आर्थिक उलाढाल सुरू झाली. जळगाव जिल्हा दूध संघाने गुरांसाठी पशुखाद्य कारखाना सुरू केला. अनेकांना रोजगार मिळाला. १९८० पर्यंत अत्यंत चांगल्या पद्धतीने चालणारा दूध संघ त्यानंतर कोणतीही विकासाची दृष्टी नसलेल्या खादाड राजकीय मंडळींच्या हातात गेला. तिथून या संघाला ओरबडण्याचा कार्यक्रम सुरू झाला.

भ्रष्ट पुढार्‍यांमुळे दुध संघाची घरघर सुरू झाली सक्षमपणे चालणारा दूध संघ १९९१- ९२ पर्यंत डब घाईत आला. जिल्ह्यात धवल क्रांती चे स्वप्न भंग पावले. गावागावातले दूध संकलन केंद्र बंद पडले. दूध उत्पादक शेतकरी हतबल झाला. यातच कुठलीही शासकीय मदत मिळत नसल्याने दुध संघात बेबंदशाही सुरू झाली. शेवटी राज्य शासनाने हा दूध संघ एनडीडीबी च्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला. एनडीडीबीने कठोर आर्थिक पावले उचलत या दूध संघाला उभा करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात त्यांना बर्‍याच अंशी यशही आलं. एनडीडीबीच्या काळामध्ये जिल्हा दूध संघाच्या विकास या ब्रँडला प्रतिष्ठा प्राप्त झाली. एक अत्यंत दर्जेदार, विश्‍वासार्ह व चांगला ब्रँड अशी राज्यभर ख्याती प्राप्त झाली. गाई आणि म्हशीच्या दुधासह लोणी, तूप, श्रीखंड, पनीर, खवा, पेढा आदी विकासची उत्पादने ही नावलौकिकाला आलीत. महाराष्ट्रात विकास दुधाची मागणी वाढली. दूध संकलन तीन लाख लिटर पर्यंत गेले. १९९५ पासून २०१५ पर्यंत एनडीडीबीने जळगाव जिल्हा दूध संघाची धुरा अत्यंत सक्षमपणे सांभाळली.

मधल्या काळात जिल्ह्यातील एका मोठ्या उद्योग समूहाने सुद्धा प्रचंड नफा असणार्‍या या उद्योगाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यामध्ये यशस्वी होऊ शकले नाही. २०१५ नंतर एनडीडीबी च्या ताब्यात असलेल्या जिल्हा दूध संघाचा ताबा राजकीय व्यक्तींकडे गेला. पुन्हा तिथे राजकीय लोकांचा आर्थिक फायदा कसा होईल याचे नियोजन केले गेले. जे जे कंत्राटदार होते त्यामध्ये काही अपवाद वगळले तर विविध दुध वाहतूक व इतर कंत्राट संचालक मंडळाच्या नात्यागोत्यातच दिल्या गेले. गरज नसताना कर्मचार्‍यांची मेगा भरती केल्या गेली. त्यामुळे या दूध संघावर आर्थिक ताण पडला. फायद्यात असणारा दूध संघ चा नफा कमी झाला. याचा विपरीत परिणाम दूध उत्पादकांवर झाला.

दुध संघाच्या स्थापनेनंतर अनेक राजकीय नेत्यांना मोठा रोजगार मिळाला. त्यातून कुणी आमदार झाले. कुणी खासदार झाले. काही व्यापारी-उद्योजकांशी लागेबांधे ठेवणारे हे सारे शेतकरी हिताला काळीमा फासणारे शेतकर्‍यांचीच मुलं होती, हे दुर्दैवानं नमूद करावं लागेल. शेतकर्‍यांच्या हिताचा कुठलाही निर्णय या दूध संघातून कधीही घेतला गेला नाही. अत्यंत दर्जेदार पशुखाद्य निर्माण करणार्‍या दूध संघाच्या पशुखाद्य निर्मितीच्या कारखान्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आलं. ठरवून तो कारखाना बंद कसा पडेल हा सुद्धा प्रयत्न केला गेला.

जळगाव जिल्हा दूध संघ हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठीच आहे. असा एकमेव हेतू राजकीय मंडळींनी ठेवला आहे. या दूध संघात लोणी, तूप, श्रीखंड, दही, खवा, पेढा व इतर उत्पादन या अत्यंत महागड्या दुग्धजन्य वस्तूंचा मोठा काळाबाजार झाल्याची चर्चा अनेक वर्षापासून सुरू आहे. काल-परवा याचाच एक भाग म्हणून एक कोटी पंधरा लाख रुपयाचा भ्रष्टाचार उघडकीस आल्याचा सांगण्यात आले. वास्तविक या दूध संघाची दररोजची कोट्यावधी रुपयाची उलाढाल पाहता त्या दृष्टीने एक कोटी पंधरा लाखाचा भ्रष्टाचार अत्यंत किरकोळ मानल्या जातो. अशीच जनमानसात कायमचे चर्चा राहिलेली आहे.विशेष म्हणजे जिल्हा दूध संघापेक्षा जळगाव जिल्ह्यात पारोळा, पाचोरा, चाळीसगाव, बोदवड सारख्या भागातील डेअरी मोठ्या प्रमाणात कार्यरत आहेत. ते कोणाच्या आशीर्वादाने याचाही शोध घेण्याची गरज आहे.

जळगाव जिल्हा दूध संघात कुंपणच शेत खात आहे हे काल सिद्ध झालं. आमच्या माहितीप्रमाणे या जिल्हा दूध संघात उदाहरणार्थ जर १००० लिटर दूध संकलन झालं तर त्यातून या दूध संघाला सर्व खर्च जाऊन पंचवीस हजार रुपये नफा उरतो. याचा अर्थ तीन लाख लिटर मागे या दूध संघाला प्रतिदिन ७५ लक्ष रुपये नफा निश्चितपणे मिळतो आहे. मग या नफ्याचे दूध कुठे मुरते आहे ? याचा शोध घेण्यासाठी विशेष तपासाची गरज आहे.

आमच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात सक्षम पणे शीतकरण केंद्र नसल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये असलेल्या शीतकरण केंद्रात येथील पावडर, लोणी व इतर चीजा पाठवल्या जातात ही तर धक्कादायकच बाब आहे. काही मंडळींशी चर्चा करताना त्यांनी असे सांगितले की हे केवळ नावालाच आहे. या दूध संघातून बाहेर निघालेलं लोणी, दुध पावडर, तुप याच जिल्ह्यातील खाजगी डेअर्‍यांना दिलं जातं. पण नाव सातार्‍याचा टाकलं जातं. म्हणजे ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल तो लाटल्या जातो. लवकर खराब होणारे दुधाचे नाशवंत पदार्थ जास्त काळ टिकले नाही ते रस्त्यात खराब झाले ते फिकावे लागले हे सोपे कारण सांगून इथंही मलिदा लाटण्याचं काम ही या दूध संघाचे अधिकारी करत असतील याही शंका उपस्थित झाल्या आहेत.

अती विशेष म्हणजे जळगाव जिल्हा दुध संघाच्या आवारातच जागा दुध संघाची, मशिनरी दुध संघाची, कर्मचारी दुध संघाचे असे असतांनाही विशिष्ट संचालकांना आतल्या आत जॉबवर्कचे ठेके दिले गेल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यांच्या कडून पनीर, तुप, खवा, श्रीखंड तयार केल्याचे दाखवुन कोट्यावधी रुपये लाटल्याची सर्वत्र चर्चा ऐकायला मिळते. हे जर खरे असेल तर ही शासनासह दुध उत्पादकां पासुन ग्राहकांपर्यंत फसवणूक नव्हे तर काय?मग विश्वास तरी कुणावर ठेवायचा?

सध्या जळगाव जिल्हा दुध संघाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. दोन्ही अनेक आमदार व वरिष्ठ नेते यासह राज्याचे वरिष्ठ मंत्रीही गुडघ्याला बाशिंग बांधून नवरदेव म्हणून या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अशा जिल्हास्तरीय संस्था जिल्हा बँक असो जिल्हा दूध संघ असो विक्री संघ असो इतर जिल्हास्तरीय सहकारी संस्था असो या संस्थांवर प्रतिनिधीपदी दुसर्‍या फळीतल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली पाहिजे. पण जळगाव जिल्ह्यात प्रत्येक आमदार खासदार मंत्री मात्र ही सारी पदं आमच्याच घरात असली पाहिजे बाकीच्यांनी सतरंज्या, झोरे, खुर्च्या उचलण्याचं काम केलं पाहिजे. या भुमिकेत आहेत.आपला कार्यकर्ता आर्थिक प्रबळ होउच नये. सगळी आर्थिक कुरणे आपल्या ताब्यात असली पाहिजे हे एकंदरीत दिसून आलेले आहे.

या निवडणुकीच्या रणधुमाळीत एक अत्यंत चिंतनीय बाब म्हणजे ज्या गाई म्हशींच्या दुधाच्या बळावर जिल्हा दूध संघ चालतो आहे त्या मुक्या गाई म्हशीना लंपी नावाच्या रोगाने ग्रासलेले आहे. वास्तविक दूध संघाने या अत्यंत गंभीर घटनेमध्ये लक्ष घालून जनावरांची काळजी घेणे अत्यंत गरजेचे होते. परंतु आरोप प्रर्‍यारोप स्वतःचा राजकीय स्वार्थ आर्थिक फायदा आणि सत्तेच्या नशेत दूध संघाच्या पदाधिकार्‍यांनी याकडे साफ दुर्लक्ष केलेले आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे.या साठी अशी शेतकर्‍यांचे व ग्राहकांचे हीत जोपासणारी संस्था पुन्हा एनडीडीबी अथवा अमुल डेअरी कडे सुपूर्त करणे काळाची गरज आहे. तरच विकास या ब्रँडला गतवैभव प्राप्त होईल. अन्यथा आदीप्रमाणेच भ्रष्ट पुढार्‍यांच्या मगरमिठीत विकास कुठे हरवेल हे समजणार देखील नाही. तूर्तास दुध संघात चरण्यासाठी एकदम ओके स्थिती असल्याने यावर बोके टपल्याची चर्चा जनमानसात आहे.

अशोक एस. शिंदे
संस्थापक अध्यक्ष : छत्रपती शिवाजी ब्रिगेड महाराष्ट्र

मोबाईल : ९४२२२८३२३३

Protected Content