Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अर्थसंकल्प समजून घेतांना अर्थ व्याप्ती लक्षात घेणे गरजेचे – शशिकांत धामणे

चाळीसगाव प्रतिनिधी । अर्थकारणाचा समजून घेतांना त्यातील अर्थ व्याप्ती आणि संचय समजून घेणे अत्यावश्यक असल्याचे चार्टर्ड अकाउंटट शशिकांत धामणे यांनी व्यापाऱ्यांशी हितगुज करतांना सांगितले. रोटरी क्लब ऑफ चाळीसगाव यांच्या वतीने ‘अ-अर्थकारणाचा’ या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यापारी देखरेख संघाचे अध्यक्ष प्रदीपदादा देशमुख, रोटरी कलबचे अध्यक्ष डॉ. संदीप देशमुख, सचिव रोशन ताथेड आदी उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्याचा मान मिळवणाऱ्या निर्मला सीतारामण या दुसऱ्या महिला ठरल्या असून याआधी ५० वर्षापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री इंदिरा गांधी यांनी देशाचा अर्थसंकल्प सादर केला होता, परंतु यंदा ब्रीफकेस परंपरेला छेद देत सीतारामन यांनी लाल कापडात गुंडाळून अर्थसंकल्प सादर केला. यावेळेस अर्थसंकल्पाला ‘बही खाता’ असे नाव देण्यात आले. सादर केलेल्या अर्थसंकल्पातील तरतुदी नेमक्या काय आहेत हे प्रत्येकाने समजून घ्यायला हव्यात. याच वर्षी भारताची ३ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था होणार आहे. २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ लाख कोटी अमेरिकन डॉलर्सवर नेण्याचे लक्ष्य असून एका तासाच्या आत छोट्या दुकानदारांना कर्ज देणारी योजना अंमलात आणली असून सरकारी बँकांना ७० हजार कोटी देण्याचे जाहीर करण्यात आले. आयकरातील विविध तरतुदीमुळे करदात्यांच्या संख्येत ४८% इतकी वाढ झाली असून केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे थेट करांमध्ये गेल्या दोन वर्षांत ७८ टक्क्यांपर्यंत वाढले असून ११, ३७, ००० कोटी इतका कर प्राप्त झाला आहे. यात ३ कोटी उद्योजकांना पेन्शन दिले जाणार असून जीएसटी नोंदणीकृत लघु-मध्यम उद्योगांना २ टक्के व्याजदरात सुट मिळणार आहे. या अर्थसंकल्पात दळणवळणाच्या सोईमध्ये अभूतपूर्व गुंतवणूक करुन रस्ते बांधणी, जलमार्ग, वायुमार्ग व रेल्वेमार्ग विकसीत केले जाणार आहे. कर व कर्जबुडवे यांचेवर सरकारची कडक नजर राहणार असून त्यांच्याकडून कर व कर्ज वसुली केली जाणार आहे. करांचे विवरण आता आधार नंबरवर भरता येणार असून त्यामुळे करदात्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ होईल असा विश्वास शशिकांत धामणे यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी रोटरी सदस्य, व्यापारी बांधव तसेच अनेकविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नरेंद्र शिरुडे यांनी केले तर आभार डॉ. संदीप देशमुख यांनी मानले तर यशस्वीतेसाठी प्रकल्प प्रमुख संदीप चव्हाण, सहाय्यक प्रकल्प प्रमुख नरेंद्र शिरुडे यांनी परिश्रम घेतलेत.

Exit mobile version