Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठाच्या बैठकीत विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स आयोजनास मान्यता

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कोविड कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ब्रीज कोर्स आयोजित करण्यास कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्या परिषदेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

आज सोमवार, दि. २९ ऑगस्ट रोजी कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांच्या अध्यक्षतेखाली विद्या परिषदेची बैठक झाली. यावेळी मंचावर प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, प्रभारी कुलसचिव प्रा.किशोर पवार यांची उपस्थिती होती.  राज्य शासनाने सर्व विद्यापीठांना ब्रीज कोर्स आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत विद्यापीठ आणि महाविद्यालये बराच काळ बंद होते. ऑनलाईन पध्दतीने विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आणि परीक्षा देखील ऑनलाईन पध्दतीने झाल्या. या कालावधीत विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता या शैक्षणिक वर्षात शैक्षणिक संकल्पना आणि अभ्यासक्रमाची योग्य उजळणी व्हावी या उद्देशाने हा ब्रीज (सेतू) कोर्स राबविला जाणार आहे. या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये प्रथम वर्ष पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा एक आठवडयाचा ब्रीज कोर्स घेण्यात येणार आहे. विद्या परिषदेने या विषयाला मान्यता दिली.

बहिस्थ आणि शिक्षण अध्ययन विभागातील सर्व शिक्षणक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३ २४ पासून चॉईस बेस्ड् क्रेडीट सिस्टीम पाठ्यक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. विविध महाविद्यालयातील पदव्युत्तर स्तरावरील मानव विज्ञान, वाणिज्य व व्यवस्थापन तसेच आंतर विद्याशाखीय विद्याशाखे अंतर्गत लागू केलेला सीबीसीएस पाठयक्रम या विभागासाठी काही बदल करुन लागू केला जाणार आहे. विद्या परिषदेच्या आजच्या बैठकीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीस मान्यता देण्यात आली. त्यासाठी विद्यापीठ आणि महाविद्यालयांनी या धोरणानुसार शैक्षणिक विकास आराखडा तयार करणे, क्रेडीट  ट्रान्सफर करण्यास मान्यता मिळणे, आंतर विद्याशाखानिहाय बहुशाखानिहाय अभ्यासक्रम तयार करणे, अभ्यासक्रमांची निर्मिती करणे, आदींना या बैठकीत मान्यता देण्यात आली.  विद्या परिषद प्राधिकरणाच्या सध्याच्या सदस्यांची मुदत दि. ३१ ऑगस्ट रोजी संपत असल्यामुळे आजची शेवटची बैठक होती. कुलगुरु प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी सर्व सदस्यांनी भविष्यातही सहकार्य करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. प्रभारी कुलसचिव प्रा. किेशोर पवार यांनी आभार मानले.

Exit mobile version