Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुक्ताईनगरात नवीन विश्रामगृह शासकीय इमारत बांधकामास मंजुरी

मुक्ताईनगर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आमदार चंद्रकांत पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून केलेल्या पाठपुराव्यामुळे मुक्ताईनगर येथील नवीन विश्रामगृह शासकीय इमारतीचे बांधकाम मंजूर झाले असून या कामासाठी 6 कोटी 25 लाख रुपये मंजूर झाल्याची माहिती आ. पाटील यांनी दिली.

मुक्ताईनगर हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ व इंदोर- छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) महामार्गावर मध्यवर्ती शहर असून आदिशक्ती श्री संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पुनित झालेले तीर्थक्षेत्र असल्याने हे धार्मिक व पर्यटन स्थळ आहे त्यामुळे येथे बाहेरून येणाऱ्या प्रवासी व पर्यटक तसेच भाविकांसाठी राहण्याची व्यवस्था व्हावी, म्हणून या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी मंजुरी मिळावी, यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांचा गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा सुरू होता.

यासाठी त्यांनी सार्वजनिक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेवून जागेचे स्थळ निरीक्षण , नकाशा तसेच अंदाज पत्रक तयार करणे आदी सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सा.बा. विभागातर्फे यासंदर्भात तातडीने प्रस्ताव तयार करून शासनाकडे सादर करण्यात आला होता. तसेच आमदार पाटील यांनी तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण तसेच विद्यमान मंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागनी केलेली होती. त्यानुसार मंत्री चव्हाण यांनी मागणीला हिरवी झेंडी दिल्याने मुक्ताईनगर येथे नवीन शासकीय विश्रामगृह इमारत बांधकाम करणे (६.२५ कोटी) मंजूर केलेले आहेत. अशी माहिती आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली.

 

Exit mobile version