Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मधकेंद्र योजनेच्या लाभासाठी अर्ज करा; ग्रामोद्योग अधिकाऱ्यांचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामाद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशापालन) राज्यात कार्यान्वित झाल्या आहे. याकरीता पात्र व्यक्ती, संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याचे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

वैयक्तिक मधपाळासाठी अर्जदार साक्षर असावा, स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. केंद्र चालक प्रगतशील मधपाळामध्ये संस्था किंवा व्यक्ती अर्ज सादर करू शकतात. वैयक्तिक केंद्र चालक (प्रगतशील मधपाळ) असावा. त्यांची शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास, वय वर्ष 21 पेक्षा जास्त असावे. त्या व्यक्तीच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान एक एकर शेतजमीन किंवा भाडे तत्त्वावर घेतलेली शेतजमीन लाभार्थीकडे मधमाशापालन प्रजनन व मध उत्पादन बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी.

केंद्र चालक संस्थासाठी पात्रतामध्ये संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडे तत्त्वावर किमान एक एकर शेतजमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्त्वावर घेतलेली किमान 1000 चौ. फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादना बाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेले सेवक असावेत.

या योजनेची वैशिष्ट्ये मधकेंद्र योजनेच्या निकषाप्रमाणे निवडीनंतर 50 टक्के रक्कम भरल्यानंतरच मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाते. साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान व 50 टक्के स्वगुंतवणूक आवश्यक आहे. तर लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंध पत्र लिहून देणे अनिवार्य राहील. 50 टक्के स्वगुंतवणूक ही निवड झाल्यानंतर प्रशिक्षण चालू होण्याआगोदर भरावी लागेल. मंडळाने निश्चित केलेल्या ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य राहील, अशा अटी व शर्ती आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, द्वारा जिल्हा केंद्र, आय. टी. आय. शेजारी, जळगाव, संपर्क श्री. सुरवाडे, मोबाईल क्र. (9623578740),  मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, शासकीय बंगला नं. ५, मु.पो. ता. महाबळेश्वर, जि. सातारा 412806,  दूरध्वनी (02168-260264) येथे संपर्क साधावा, असेही जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांनी कळविले आहे.

Exit mobile version