Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

तरूणांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी।शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक व युवतीची वाढती संख्या व उद्योग , व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या नावाने महत्त्वाकांक्षी योजना २०१९-२०२० पासून राबविण्यात येत आहे. जिल्हा उद्योग केंद्र व खादी ग्रामोद्योग मंडळामार्फत ही योजना राबविण्यात येते. या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक चेतन पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

पात्र उत्पादन व सेवा उद्योग व्यवसायासाठी योजना राबविण्यात येते. योजनेत कुठलेही स्थायी उत्पन्न नसलेले महाराष्ट्रातील स्थानिक रहिवासी ज्यांचे वय १८ वर्ष पूर्ण अधिकतम ४५ वर्ष (अनु.जाती/जमाती/महिला/विमुक्त भटक्या जाती/जमाती/अपंग/अल्पसंख्याक/माजी सैनिक यांचेसाठी ५ वर्ष शिथील) पात्र राहतील. योजनेसाठी शैक्षणिक पात्रता ही‌ दहा लाखांच्या प्रकल्पासाठी इयत्ता ७ वी उत्तीर्ण आहे. पंचवीस लाखांवरील प्रकल्पासाठी इयत्ता १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराने यापूर्वी शासनाचे कोणत्याही अनुदानावर आधारीत स्वंयरोजगार योजनेचा लाभ घेतलेला नसावा.

या योजनेमध्ये उत्पादन व्यवसायासाठी (उदा. बेकरी उत्पादन, पशुखाद्य निर्मिती, फॅब्रिकेशन इत्यादी) ५० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल व सेवा व्यवसायासाठी (सलुन, हॉटेल, दुरुस्ती सेंटर इत्यादी) २० लाखापर्यंतच्या प्रकल्पासाठी अर्ज करता येईल. या योजनेत अनुसूचित जाती- जमाती, महिला, विमुक्त भटक्या जाती, जमाती, दिव्यांग, अल्पसंख्याक, माजी सैनिक या प्रवर्गातील शहरी भागासाठी बँकेने मंजूर केलेल्या प्रकल्प किमतीच्या २५ टक्के अनुदान व ग्रामीण भागासाठी ३५ टक्के अनुदान पात्र असेल. त्यासाठी अर्जदाराची स्वगुंतवणूक ५ टक्के करावी लागेल. उर्वरीत सर्व प्रवर्गासाठी अर्जदार हा शहरी असेल तर १५ टक्के व ग्रामीण असेल तर २५ टक्के अनुदानासाठी पात्र असेल. या लाभार्थीना १० टक्के स्वगुंतवणूक करावी लागेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराने https://maha-cmegp.gov.in या वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज वेबसाईटवर करतांना अर्जदारास स्वतःचा पासपोर्ट फोटो, आधार कार्ड, रहिवास दाखला/शाळा सोडल्याचा दाखला / जन्म दाखला, मार्कशीट, पॅन कार्ड, प्रकल्प अहवाल, जातीचा दाखला, दिव्यांग दाखला तसेच वेबसाईटवरुन डाऊनलोड करुन पुर्ण भरलेले हमीपत्र (undertaking form) ही कागदपत्रे अपलोड upload करावी लागतात.

जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती ज्यांना नवीन उद्योग/व्यवसाय सुरु करावयाचा असेल त्यांनी वरील वेबसाईटवर अर्ज ऑनलाईन करावा. या योजनेबाबत सविस्तर माहिती घेण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळ कार्यालय, शासकीय आयटीआयजवळ, जळगांव येथे कार्यालयीन वेळेत भेट द्यावी. (Tel No. 0257- 2252832 Email – didic.jalgaon@maharashtra.gov.in) ही योजना राबविण्यासाठी या कार्यालयाकडून कोणत्याही खाजगी व्यक्तीची नेमणूक केली जात नाही तसेच सदर बाबतीत खाजगी व्यक्तींकडून फसवणूक झाल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. तरी जिल्हयातील जास्तीत जास्त अर्जदारांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज पोर्टलवर परिपूर्ण आवश्यक त्या कागदपत्रासह अर्ज सादर करावेत. असे आवाहन श्री.पाटील यांनी केले आहे.
00000000

Exit mobile version