Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

युवक कल्याण अनुदान योजनेकरीता 20 जुलैपूर्वी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, जळगाव मार्फत युवक कल्याण विषयक अनुदान योजना सन 2019-20 या योजनांतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत पंजीबद्ध असलेल्या युवक मंडळ, संस्था यांना प्रशिक्षण शिबीर राबविण्याकरिता शासनामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. तरी प्रस्ताव दाखल केलेल्या संस्थांनी अपलोड केलेल्या प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मुळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह 20 जुलैपूर्वी सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

युवक कल्याण अनुदान योजना ही योजना सर्वसाधारण व अनुसुचित जाती उपयोजना या दोन प्रकारात राबविली जाते. युवक व युवतींना व्यवसाय मार्गदर्शन शिबीर, स्वयंरोजगार प्रशिक्षण इत्यादी आयोजनासाठी युवक कल्याण योजनांतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात आर्थिक सहाय्य अनुदान उपलब्धनुसार देण्यात येणार आहे. स्वयंसेवी संस्थानी प्रशिक्षण देण्यासाठी व्यवसाय प्रशिक्षण व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र राज्य, मिटकॉन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (डी.आर.डी.ए.) जिल्हा उद्योग केंद्र किंवा इतर शासनमान्यता प्राप्त संस्था इत्यादीच्या समन्वयाने प्रशिक्षणाचे आयोजन करावयाचे आहे. या योजनांतर्गत संस्थेला, मंडळाला शासननिर्णयानुसार शासनामार्फत 25 हजार पर्यंत अनुदान देण्यात येते. संस्थेला, मंडळाने शासनाकडून प्राप्त अनुदानाइतकी रक्कम स्वत:चा हिस्सा टाकुन प्रशिक्षण शिबीर राबवयाचे आहे. प्रशिक्षण शिबिर घेण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांना अनुदान उपलब्धेनुसार देण्यात येणार आहे.

सन 2019-20 या वर्षात सदर योजनेचा लाभ, फायदा घेवू इच्छिणाऱ्या संस्थांनी अर्जाचा विहित नमुना व अधिक माहितीसाठी जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, श्री. छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव येथे दिनांक 1 ते 20 जुलै, 2019 पर्यंत कार्यालयीन वेळेत संपर्क साधुन त्याच कालावधीत परिपूर्ण प्रस्ताव हा ऑन लाईनद्वारे jalgaonsports.in वर अपलोड करुन व अपलोड केलेला प्रस्तावाची प्रिंट काढून ती प्रत व मुळ कागदपत्र असलेला प्रस्ताव असे मुळ दोन प्रतीत प्रस्ताव अर्जासोबत असलेल्या यादीनुसार योग्य त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. असे सुनंदा पाटील, जिल्हा क्रिडा अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Exit mobile version