Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शासनाच्या नवीन निर्बंधाचे काटेकोर पालन करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन

जळगाव प्रतिनिधी ।  कोरोनाच्या आपत्तीत जिल्हावासियांना आरोग्याच्या सर्व आवश्यक सुविधा वेळीच उपलब्ध होण्यासाठी आपण कटिबध्द आहे. कोरोनाची साखळी खंडित होण्यासाठी शासन व प्रशासनाने लागू केलेले निर्बंध हे जिल्ह्यातील नागरिकांच्या हितासाठीच आहेत. त्यामुळे त्याचे सर्व जिल्हावासियांनी काटेकोर पालन करावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे आज जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीव्दारे मंत्रीमंडळ बैठकीत सहभागी झाले होते. मंत्रीमंडळाच्या बैठकीत त्यांनी जळगाव जिल्ह्यातील कोरोना स्थितीची माहिती देऊन सध्या सुरू असलेल्या उपाययोजनांसह जिल्ह्यात आवश्यक असलेल्या बाबींचा उहापोह केला.

त्यानंतर त्यांनी जिल्हा प्रशासनाची कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांबाबत महत्वाची बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी अभिजीत राऊत उपस्थित होते. तर जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, मुख्याधिकारी यांची ऑनलाईन उपस्थिती होती. यात श्री. पाटील यांनी कोविड रुग्णांवर योग्य उपचाराच्या व आवश्यक त्या सोईसुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्यात. तसेच रुग्णांना वेळेवर आवश्यक तेवढाच ऑक्सीजन पुरवठा करणेबाबत निर्देश दिले.

याप्रसंगी पालकमंत्री म्हणाले की, जिल्ह्यातील नागरिकांची कोरोनापासून सुरक्षा व्हावी यासाठी शासन व प्रशासन कटीबध्द आहेत. बाधित रूग्णांसाठी जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या बेड मॅनेजमेंट प्रणालीचा रूग्णांना लाभ होत आहेत. याचप्रकारे रेमडेसिवीरचा अचूक पुरवठा होण्यासाठी प्रणाली विकसित करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन मोहाडी रोडवरील महिला रूग्णालयात अतिशय अद्ययावत अशी व्यवस्था करण्यात आली असून याच धर्तीवर प्रत्येक तालुका पातळीवर देखील रूग्णांना वाढीव बेड उपलब्ध करण्यात येत आहेत

कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी 

राज्य शासनाने उद्यापासून कडक निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधांचे  जिल्ह्यातील नागरिकांनी तंतोतंत पालन करण्याचे आवाहन देखील पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले. 

आगामी सण, उत्सव साधेपणाने साजरे करा 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले निर्बंध लक्षात घेता जिल्ह्यातील नागरिकांनी आगामी श्रीराम नवमी, हनुमान जयंती व महावीर जयंती हे उत्सव अतिशय साधेपणाने साजरे करावेत. असे आवाहन देखील ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हावासियांना केले आहे.

 

Exit mobile version