Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पीआय धनवडे कंट्रोलला जमा : सहा अधिकार्‍यांच्या बदल्या

जळगाव प्रतिनिधी | वसुलीच्या कथित ऑडिओ क्लीपसह अनेक कारणांनी चर्चेत असणारे पहूर स्थानकाचे पीआय अरूण धनवडे यांना पोलीस नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले असून यासोबत एकूण सहा अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

पहूर पोलीस स्थानकाचा कार्यभार असणारे पीआय अरूण धनवडे हे गेल्या अनेक दिवसांपासून वादात सापडले होते. गेल्या महिन्यात गुरे चोरीवरून पैसे वसुलीची एक क्लीप व्हायरल झाली होती. या प्रकरणाची चौकशी करण्यात आली होती. यातच अरूण धनवडे यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करून वाढदिवस साजरा केल्याचे प्रकरण देखील गाजले होते. यामुळे त्यांच्यावर कारवाई अपेक्षित असल्याचे मानले जात होते. यानुसार त्यांना काल रात्री जिल्हा पोलीस नियंत्रण कक्षात बदली म्हणून पाठविण्यात आले आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी धनवडे यांच्यासह इतर पाच अधिकार्‍यांच्या देखील बदल्या केल्या आहेत. यात भुसावळ बाजारपेठ स्थानकाचे दिलीप भागवत यांना आर्थिक गुन्हा नियंत्रण शाखेत ट्रान्सफर करण्यात आले आहे. त्यांच्या जागी बोदवडचे राहूल गायकवाड यांना नेमण्यात आले आहे. पहूर स्थानकात भुसावळ शहरचे प्रताप इंगळे यांना पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी नाशिक येथून गजानन पडघन हे आले आहेत. तर जळगावच्या नियंत्रण कक्षात असलेल्या राजेंद्र गुंजाळ यांना बोदवड पोलीस स्थानक मिळाले आहे.

Exit mobile version