Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

‘अनुलोम’चे परिवर्तनीय कार्य कौतुकास्पद – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

fadnwish

जळगाव प्रतिनिधी । शासनाच्या विविध प्रकारच्या योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी ‘अनुलोम’ ने सुरू केलेले कार्य कौतुकास्पद व प्रशसंनीय आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. जैन हील्स येथील कस्तुरबा गांधी सभागृहात आज सकाळी अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात ‘अनुलोम’चा चौथा वार्षिक अनुलोम संगम सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते.

यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, ‘अनुलोम’चे कार्यकारी अधिकारी अतुल वझे, पंकज पाठक उपस्थित होते. यावेळी उत्कृष्ट कार्य करणारे जनसेवक, भाग सेवक, विस्तारक यांचा मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच डॉ. नितीन खर्चे लिखित ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू’ या पुस्तकाच्या प्रा.डॉ. सुनील कुलकर्णी यांनी हिंदी भाषेत अनुवादित केलेल्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय, जीवनदर्शन के विविध पैलू’ या पुस्तकाचे प्रकाशन, अनुलोमच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, शासकीय अधिकारी आणि नागरिकांमध्ये सुसंवाद साधत अनुलोमच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. ही समाधानाची बाब आहे. तसेच गाळमुक्त धरण- गाळयुक्त शिवार अभियानात ‘अनुलोम’ संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. या संस्थेने पुढील वर्षी 2 कोटी घनमीटर गाळ काढण्याचे उद्दिष्ट ठेवण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना केले. कोकणातील पर्यटन वाढावे म्हणून गेल्या पाच वर्षात विविध पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्या. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन, मत्स्य व्यवसायाच्या वृध्दीसाठी विशेष लक्ष देण्यात आले. रायगड जिल्हा औद्योगिक विकासाच्या अग्रभागी आणण्यात आला. ‘नैना’च्या माध्यमातून तिसरी मुंबई आकारास येत आहे. पालघर व ठाणे जिल्ह्याचा बहुतांश भाग आदिवासी बहुल आहे. या भागात आरोग्य सुविधांकडे विशेष लक्ष दिले. त्यामुळे या भागाचा आरोग्य निर्देशांक उंचावला असून कुपोषण मुक्तीकडे वाटचाल सुरू आहे.

या कार्यक्रमात जनसेवकांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना कोकणचा कॅलिफोर्निया केव्हा होणार या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. तसेच कॅलिफोर्नियापेक्षा कोकण समृध्द असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच येत्या काळात १०० लाख कोटी रुपये खर्चून पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेचा विस्तार होत असून २०२५ पर्यंत देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियनपर्यंत नेण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नियोजन आहे. यामुळे शेती व्यवसाय, सेवा, उद्योग क्षेत्राच्या विस्तारास संधी आहे. त्यातून रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध होतील. त्यामुळे देशाची वाटचाल विकसित देशाच्या निर्मितीकडे सुरू आहे. त्यामुळे गाव, गरीब आणि शेतकऱ्यांचा विकास होईल. त्यासाठी पुढील पाच वर्षे महत्वाची असून त्यासाठी ‘अनुलोम’ला विकासाची संकल्पना वंचित घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अधिक गतीने काम करावे लागेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.

‘अनुलोम’ संस्था नाही, तर परिवार आहे. या परिवाराचा आता बृहत परिवार व्हावा. या बृहत परिवाराने जैवविविधता आणि पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पुढे यावे. ३३ कोटी वृक्षारोपण, जलसंधारणसाठी समाजात जाणीव जागृती निर्माण करावी, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. यावेळी श्री. वझे, श्री. पाठक, चंद्रकांत पवार आदींनी मनोगत व्यक्त केले.

Exit mobile version