Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

खाते वाटप जाहीर होताच ना. अनिल पाटील यांच्या समर्थकांचा जल्लोष

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | ना. अनिल भाईदास पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन खात्याची धुरा मिळाल्याचे वृत्त येताच येथे जोरदार जल्लोष करण्यात आला.

नामदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर त्यांना कोणते खाते मिळणार याबाबत अमळनेर मतदारसंघात उत्सुकता असताना काल मुंबई येथे अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन मंत्रालयाचे खाते जाहीर झाल्याने अमळनेर येथे कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला.

मंत्री पद विस्तारानंतर खातेवाटप संदर्भात विलंब होत असल्याने नव्या मंत्र्यांना विना खात्याचे मंत्री म्हणून काम पहावे लागत होते,नव्या मंत्र्यांना कोणकोणते खाते मिळणार याबाबत माध्यमांमध्ये वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात होते, यात अनिल पाटील यांच्या बाबतीत देखील वेगवेगळ्या खात्यांची चर्चा होत होती,अखेर पक्षाच्या बैठकीत खाते वाटपाचा तिढा सुटून काल दुपारी मुंबई येथे राजभवनात खाते वाटप जाहीर होऊन यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अर्थ व नियोजन तर अनिल पाटील यांना मदत व पुनर्वसन आणि इतर मंत्र्यांची देखील खाती जाहीर झाली.

याच्याशी संबंधीत वृत्त माध्यमांवर येताच अमळनेरात येथे अनिल पाटील कार्यालयाजवळ जल्लोष साजरा झाला.यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सौ जयश्री अनिल पाटील यांच्या सह पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी जोरदार आतषबाजीसह घोषणा देण्यात आल्या.

Exit mobile version