Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अनिल चौधरींनी प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविली; जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार (व्हिडीओ)

जळगाव सचिन गोसावी । भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी यावल-रावेर विधानसभा मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवितांना अनेक गुन्ह्यांची माहिती लपविली असल्याचा आरोप दीपक पाटील आणि सुधाकर सनान्से यांनी केला असून याबाबत जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार केली आहे. चौधरींवर अलीकडेच गाळ्याबाबत गुन्हा दाखल झाला असतांना या पाठोपाठ ही तक्रार करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

भुसावळचे माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्याविरूध्द न्यायालयाच्या आदेशाने ममता सुधाकर सनान्से यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात भुसावळ शहरातील नवशक्ती आर्केडमधील दोन गाळे ६० लाख रूपये घेऊन खरेदी करून न दिल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे.

दरम्यान, याच प्रकरणातील फिर्यादींचे पती सुधाकर सनान्से आणि दीपक पाटील यांनी आज सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेऊन एक निवेदन सादर केले. यात अनिल चौधरी यांनी अनेक गुन्ह्यांची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. चौधरी यांना झालेल्या शिक्षेचाही यात समावेश नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच नवशक्ती आर्केडमधील दोन गाळ्यांचे मूल्य हे आरटीजीएसने अनिल चौधरी यांना देण्यात आल्यानंतरही त्यांनी खरेदीस टाळाटाळ केल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती सुधाकर सनान्से यांनी दिली.

यामुळे जिल्हाधिकार्‍यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुधाकर सनान्से आणि दीपक पाटील यांनी केली आहे. यामुळे आता या चौकशीत नेमके काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

खालील व्हिडीओत पहा सुधाकर सनान्से व दीपक पाटील यांचे आरोप नेमके काय आहेत ते ?

Exit mobile version