Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

संतप्त विद्यार्थ्यांनी पाससाठी गाठले आमदार कार्यालय

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अमळनेर बसस्थानकात अनियमित बसफेऱ्यांचा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाससाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भांत विद्यार्थ्यांनी थेट आमदार अनिल पाटील यांचे कार्यालय गाठले व एसटी पाससाठी येणाऱ्या अडचणीचा पाढाच वाचला. 

गेल्या कित्येक दिवसांपासून अमळनेर आगारात वेळेवर पास उपलब्ध होत नसल्याने शालेय विद्यार्थ्यांचें शैक्षणिक नुकसान होत आहे. संपूर्ण शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी, विद्यार्थिनी शिक्षणासाठी प्रवास करत असतात.

यात पारोळा तालुक्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पास सवलतीची व्यवस्था अमळनेर आगारातच असल्याने याठिकाणी पास काढण्यासाठी अक्षरशः झुंबड उडते.

याच पार्श्वभूमीवर आज अमळनेर बसस्थानकात अनियमित बसफेऱ्यांचा तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पाससाठी येणाऱ्या अडचणीसंदर्भांत विद्यार्थ्यांनी थेट आमदार अनिल पाटील यांचे कार्यालय गाठले व एसटी पाससाठी येणाऱ्या अडचणीचा पाढाच वाचला. आमदार अनिल पाटील यांनी विद्यार्थी यांची बाजू ऐकून घेत प्रत्यक्ष बसस्थानकात विद्यार्थी व डेपो मॅनेजर यांच्याशी चर्चा करून पाससाठी एक खिडकी वाढविण्याची मागणी केली.

‘सध्या शाळा, कॉलेज नियमित सुरू झाल्या आहेत, अमळनेर डेपो तर्फे पास वितरित करण्यासाठी एकच खिडकी सुरू आहे. त्यामुळे शैक्षणिक सवलत पास मिळवण्यासाठी ४ ते ५ दिवस शाळा, कॉलेज बुडवून रांगेत उभे राहूनसुद्धा पास मिळत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण पास नसल्यामुळे पूर्ण भाडे खर्च करून आर्थिक भुदंड विद्यार्थ्यांना सोसावा लागतो.’

या समस्या विद्यार्थ्यांनी आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यालयात जावून आमदारांना सांगितली आमदारांनी अमळनेर बस स्थानकात जाऊन डेपो मॅनेजर पठाण यांच्याशी चर्चा केली विभाग नियंत्रक जगनोर यांच्याशी दूरध्वनीद्वारा चर्चा करून पास वितरित करण्यासाठी अजून एक वाढीव खिडकी सुरू करण्याची मागणी केली.

आमदारांनी केलेल्या मागणीस तात्काळ प्रतिसाद देऊन विभाग नियंत्रक जगनोर यांनी तात्काळ पास वितरित करण्यासाठी दुसरी खिडकी उघडून दिली जाईल. असे आश्वासन दिले. याप्रसंगी कामगार नेते एल.टी.पाटील, राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष प्रा.सुरेश पाटील व एस.टी.महामंडळ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version