Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आनंद दिघे यांचा मृत्यू नैसर्गिक – नारायण राणे

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या दिघे मृत्यू प्रकरणावर नारायण राणेंनी अखेर पडदा टाकला आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या हत्येचा कट पूर्वनियोजित असून, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे भासवण्यात आल्याचा आरोप राणेंचे सुपुत्र निलेश राणे यांनी केला होता. त्या दाव्याचे नारायण राणेंनी खंडन केले आहे. आनंद दिघे यांच्या मृत्यूसंदर्भात मध्यंतरी जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत, असे नारायण राणे म्हणाले आहेत.

चुकीच्या गोष्टींची मी समर्थन करणार नाही, दिघेंचा मृत्यू कोणी मारून झालेला नाही, कारण दिघेंना त्यावेळेला शेवटचा भेटणारा मी होतो, मी निघाल्यानंतर काही क्षणातच त्यांचा प्राण गेला. आनंद दिघेंचा मृत्यू नैसर्गिक आहे, तो कोणत्याही घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहीत आहे, असे नारायण राणेंनी सांगितले आहे. यापुढे या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत. मी निलेश राणे यांना हे वास्तव सांगेन,” असेही राणे यांनी म्हटले आहे. नारायण राणे पुढे म्हणाले की, “मी भेटायला गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला आणि डॉ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी लगेच तशी व्यवस्था केली पण डॉ. मांडके येण्याअगोदरच दिघे यांचा मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बाळासाहेबांवर आधी जे आरोप झाले, त्याच्याशी मी सहमत नाही”.

Exit mobile version