मराठा समाजासाठी दुर्दैवी दिवस : खा. संभाजीराजे भोसले

मुंबई प्रतिनिधी । सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आजचा दिवस हा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सध्या कोरोनाची आपत्ती सुरू असल्याने समाजातून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटू नये असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.

मराठा समाजाला मिळालेले आरक्षण अवैध असल्याचा महत्वपूर्ण निकाल आज सुप्रीम कोर्टाने दिला आहे. यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे. अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. त्यानंतर ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यानंतर आज पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने निकाल दिला. यासाठी न्यायालयाने चार स्वतंत्र निकालपत्रे दिली आहेत. यात मराठा समाजाला आरक्षण देता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देता येत नसल्याचे कोर्टाने न्यायालयात स्पष्ट करून हा निकाल दिला.

आज सकाळी हा निकाल आल्यानंतर समाजातून याच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. सुप्रीम कोर्टाने मराठा समाजाला आरक्षण नाकारल्यानंतर खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आजचा दिवस हा समाजासाठी अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. न्यायालयाच्या या निकालावर आपण काहीही भाष्य करणार नाही. हा निकाल आम्ही स्वीकारणार आहोत. मात्र हा निकाल अतिशय दुर्दैवी असाच आहे. समाजातील वंचित घटकांना याचा मोठा फटका बसणार आहे. मात्र महाराष्ट्र हा शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा आहे. हा निकाल आपण स्वीकारायचा आहे. मराठा आरक्षणासाठी आधी फडणवीस सरकार आणि आताच्या ठाकरे सरकार या दोघांनी भक्कम बाजू मांडली. केंद्र सरकारनेही सहकार्य केले. मात्र न्यायालयाने निकाल दिल्याने नाईलाज झाला असे ते म्हणाले.

दरम्यान, समाजबांधवांनी या निकालावर तीव्र प्रतिक्रिया देऊ नसे असे आवाहन छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले आहे. कोरोनाचा हाहाकार सुरू असून याचा प्रतिकार करणे हा प्राधान्यक्रम हवा असे देखील ते म्हणाले.

Protected Content