Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विद्यापीठात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत ‘ऑनलाईन कविसंमेलन संपन्न

जळगांव प्रतिनिधी | कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ‘भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्रा’च्या वतीने ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ अंतर्गत गुरूवारी ‘निमंत्रितांचे कविसंमेलन’ऑनलाईन पध्दतीने संपन्न झाले.

ऑनलाईन कविसंमेलनात जेष्ठ कवी भगवान भटकर हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे उपस्थित होते. प्रा.शिंदे यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, “मराठी भाषा ही विविधतेने नटलेली असून ती अधिकाधिक सुदृढ कशी करता येईल याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा. यावेळी त्यांनी ‘या झोपडीत माझ्या’ ही कविता सादर केली.

यावेळी कवी वीरा राठोड यांनी ‘झगडा’ कविता सादर केली. कवयित्री माया धुप्पड यांनी ‘सांग चंद्रा’, ‘माणसांचा बाजार’ तर कवी सतीश मस्के यांनी ‘अशी आहेत माणसे’ आणि ‘बाप’, कवी बी.एन.चौधरी यांनी ‘आठवणी दंगलीच्या’ आणि ‘राम नाही’ कवी मिलिंद बागुल यांनी ‘माणसं जेव्हा माणसाला फसवतात तेव्हाच ते पुढच्या पिढीला वरसा देतात’ या विषयाची कविता सादर केली. कवयित्री लतिका चौधरी यांनी ‘वादळ ऊर्जा’ व तो या कविता सादर केल्या.

कवी जितेंद्र अहिरे यांनी ‘सायरनचा आवाज’ आणि ‘एल्गार मन’ या कविता सादर केल्या. कवयित्री विमल वाणी यांनी ‘भोळ्या मानसा’ ही कविता गायन स्वरुपात सादर केली. वाल्मिक वाघमारे यांनी ‘चांदण्या उतरल्यात माझ्यात’ आणि ‘दु:खाचा भोंगा’ या कविता सादर केल्या. प्रा.डॉ.म.सु.पगारे यांनी ‘सारगर्भ’ ही वैचारिक कविता सादर केली. कार्यक्रमास प्रा.डॉ.म.सु.पगारे, प्रा.डॉ. आशुतोष पाटील उपस्थित होते. प्रास्ताविक व सुत्रसंचालन प्रा.दीपक खरात यांनी केले. आभार महेश सुर्यवंशी यांनी मानले. कार्यक्रमात प्रशाळेतील प्राध्यापक, विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राध्यापक, कर्मचारी व आजी व माजी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

 

Exit mobile version