Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

दगडी दरवाजा बुरुजावर मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना करावी’ – बहुजन रयत परिषदेची मागणी

अमळनेर, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘मांगीर बाबा हे मातंग समाजाचे दैवत व अस्मिता असून दि.१३ तारखेपर्यंत दगडी दरवाजा बुरुजावर मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली नाही तर आम्ही काम बंद पाडू’ असा इशारा बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, ‘येथील दगडी दरवाजा काही वर्षांपूर्वी कोसळला होता. त्या एका बुरुजावर मातंग समाजाची आस्था असलेले मांगीर बाबा यांची मूर्ती होती. मात्र तो भाग त्या वेळेस कोसळला नव्हता. देखभाल दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाकडील राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीतून वगळून त्याला अमळनेर नगर परिषदेच्या अखत्यारीत द्यावे अशी मागणी तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील व त्यांचे पती साहेबराव यांनी केली होती.

त्यानुसार दगडी दरवाजा हा देखभाल दुरुस्तीसाठी अमळनेर नगर परिषदेच्या ताब्यात देण्यात आला आहे. पूजा अर्चा करून या दरवाज्याचे काम सुरू झाले होते. नंतरच्या काळात अनेक अडथळे यात आले. ते सर्व दूर होऊन कामास सुरुवात झाली. मातंग समाजाचे आराध्य दैवत मांगीर बाबा यांच्या मूर्तीची स्थापना व्हावी म्हणून मूर्तीला तयार करण्यासाठी माजी आमदार साहेबराव पाटील यांनी रोख रक्कम देखील दिली होती.

मात्र आता दगडी दरवाज्याच्या ज्या बुरुजावर मांगीर बाबांची मूर्ती होती त्याचे काम सध्या पूर्णत्वास येत आहे म्हणून अमळनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे व माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांना अनेक दिवसांपासून फोन करून व भेटून मूर्ती त्या ठिकाणी स्थापन करावी म्हणून मागणी करीत आहोत. मुख्याधिकारी मी बघतो असे सांगतात तर तत्कालीन नगराध्यक्षा पुष्पलता पाटील यांचे पती साहेबराव पाटील हे तर फोन देखील उचलत नाहीत. दगडी दरवाज्यावरील त्या बुरुजाचे काम आता प्रगतीपथावर असून ते पूर्णत्वास येत आहे. आमच्या अस्मितेला नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न प्रशासन करीत आहे. असे बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी सांगितले.

“मांगीर बाबा हे मातंग समाजाचे दैवत व अस्मिता आहेत. आमची अस्मिता मिटवण्याचा प्रयत्न कोणी केला तर आम्ही शांत राहणार नाहीत. येत्या २४ तासात म्हणजे १३ तारखेपर्यंत मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना झाली नाही तर यापुढे आम्ही काम करू देणार नाहीत. काम बंद पाडू.” असा इशारा बहुजन रयत परिषदेचे तालुकाध्यक्ष सुरेश कांबळे यांनी प्रशासनाला दिला आहे. प्रशासनाने लक्ष घालून मांगीर बाबांच्या मूर्तीची स्थापना करावी अशी मागणी आता जनमानसातून होत आहे.

Exit mobile version