Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधीतील दंगलीत पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथे काल रात्री झालेल्या दंगल प्रकरणात दोन्ही समुदायातील संशयितांची धरपकड करण्यात आली असून यात पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा गंभीर प्रयत्न करण्यात आल्याची बाब फिर्यादीतून समोर आली आहे.

याबाबत वृत्त असे की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे दोन गटांमध्ये तुफान दगडफेकीसह दंगल झाली. जुन्या जळगावातून सप्तश्रुंगी गडावर जाणार्‍या दिंडीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर वातावरण बेकाबू झाले. यात दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार दगडफेक करण्यात आली. यात अनेक जण जखमी झालेत. तर बर्‍याच वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली. रात्री उशीरा या प्रकरणी दोन्ही समुदायातील संशयितांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात दोन्ही बाजूंच्या ८३ जणांची ओळख पटल्याने त्यांच्या विरूध्द गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. तर उर्वरित जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. या संशयितांवर भादंवि कलम ३०७, ३५३,३३२, १४३, १४७, १४८, १४९, ३२३, ४२७ तसेच क्रिमीनल अमेंडमेंट ऍक्ट कायदा कलम-३,७ सह सार्वजनीक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम १९८४ चे कलम-३, सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या संदर्भात दोन्ही बाजूंच्या ५६ जणांना अटक करण्यात आली असून इतरांचा शोध सुरू करण्यात आलेला आहे. यापैकी १६ जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून इतरांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आलेले आहे. तर पोलीस प्रशासनाने तत्परता दाखविल्यामुळे दोन्ही गटांमधील धुम्मस आटोक्यात आली असली तरी गावात तणावपूर्ण शांतता आहे. कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.

दरम्यान, या दंगलीत शेख सलीम शेख गणी कुरेशी याने काल रात्री आपल्या ताब्यातील विना क्रमांकाच्या ट्रकला पोलीस कर्मचार्‍यांच्या अंगावर नेऊन त्यांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब देखील घडली आहे. यात पोलीस कर्मचारी जितेश नाईक हे जखमी झाले आहेत. यासोबत त्याने पोलिसांशी हुज्जत घालून त्यांना मारहाणीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version