Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इच्छादेवी चौकात अज्ञात वाहनाने प्रौढाला चिरडले; एमआयडीसी पोलीसात नोंद

जळगाव प्रतिनिधी । भरधाव अज्ञात वाहनाने पहाटे शतपावलीसाठी जात असलेल्या प्रौढाला चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास ईच्छादेवी चौकातील राष्ट्रीय महामार्गवर घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

नातेवाईकांकडून मिळालेली माहिती अशी की, सतीश शंकर परदेशी (वय-४३) रा. काळे नगर, शिवाजी नगर परिसर हे आपल्या कुंटुंबियासह वास्तव्याला आहे. वकीलीचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे मोठे काका हे आजारी असल्याने त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. २ एप्रिल रोजी ते रात्र भर जिल्हा रूग्णालयातच मुक्काम केला होता. आज ३ एप्रिल रोजी सकाही ५ वाजता सिंधीकॉलनीतून शतपावली करत ते राष्ट्रीय महामार्गावरील ईच्छादेवी चौकातून अजिंठा चौकाकडे जात होते. शतपावली करत असतांना त्यांना भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना चिरडले. अपघातात त्यांचा डोक्यावरून चाक केल्याने चेहऱ्याचा चेंदामेंदा झाल्याने ते जागीच गतप्राण झाले. घटनेची माहिती मिळतात एमआयडीसी पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या खिश्यातील आधारकार्डच्या आधारे त्यांची ओळख पटली. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. त्यांच्या पश्चात आई गंगाबाई, पत्नी संगिता मुलगा वंश व दोन भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोउनि रामकृष्ण पाटील आणि पोहकॉ मुदस्सर काझी करीत आहे. 

Exit mobile version