Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

इन्स्टाग्रामवर ओळखीतून एकाने महिलेच्या घरात येऊन केली चोरी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीतून सुदृढ शरीरासाठी चांगली माहिती देणारा एक इसम डोंबिवलीतील एका महिलेच्या घरी आला. सुदृढ शरीर, त्यासाठी घ्यावयाची काळजी याविषयीची माहिती देत असताना महिलेला डुलकी लागली. या संधीचा गैरफायदा घेत घरी आलेल्या इसमाने महिलेच्या घरातील चार लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे.

या इसमाने गुंगीचा फवारा फवारून किंवा काही हातचलाखी करून महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांना भुरळ घालून ही चोरी केली आहे का, या दिशेने या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत. मनीषा चंद्रहास हळदनकर असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या डोंबिवली पश्चिमेतील घनश्याम गुप्ते छेद रस्त्यावरील जयहिंद कॉलनी भागात राहतात. सोमवारी रात्री साडेअकरा ते मंगळवारी सकाळी साडेआठ वेळेत हा चोरीचा प्रकार घडला आहे. मनीषा हळदनकर यांनी याप्रकरणी विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलीस उपनिरीक्षक ए. के. आंधळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मनीषा हळदनकर यांची इन्स्टाग्रामवर प्रणव या इसमाशी ओळख झाली होती. प्रणव कुठे राहतो याची कोणतीही माहिती महिलेला नाही. इन्स्टाग्रामवरील ओळखीतून प्रणव याने तक्रारदार मनीषा यांना संपर्क केला. आपण शरीर सुदृढतेसंबंधी चांंगली माहिती देतो. ती माहिती देण्यासाठी आपण वेळ आणि भेट दिली तर आपण तुम्हास भेटतो. चांंगली माहिती मिळत असल्याने मनीषा यांनी प्रणवला घरी माहिती देण्यासाठी येण्याची अनुमती दिली.

घरात प्रणवकडून माहिती घेत असताना बोलता बोलता मनीषा यांना झोप लागली. मनीषा झोपल्या आहेत. हे पाहून प्रणवने या संधीचा गैरफायदा घेत त्याने मनीषा हळदणकर यांच्या घरातील किमती ऐवज, रोख रक्कम असा एकूण चार लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर मनीषा यांना प्रणव निघून गेला असल्याचे आणि त्याने घरातील किमती ऐवज चोरून नेला असल्याचे निदर्शनास आले. भुरट्या चोराने घरात माहिती देण्याच्या इराद्याने येऊन चोरी केली म्हणून मनीषा हळदनकर यांंनी तक्रार केली आहे. अशाप्रकारची समाजमाध्यमांत ओळख झालेल्या इसमांंपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Exit mobile version