Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमरावतीची ‘ती’ तरूणी सापडली सातार्‍यात !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कथित ‘लव्ह जिहाद’ प्रकरणातील अमरावती येथील तरूणी ही सातारा येथे आढळून आली असून तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील रुग्णवाहिकेवर चालक असणार्‍या एका मुस्लिम युवकाने सुशिक्षित हिंदू तरुणीशी लग्न केल्याचा प्रकार चांगलाच गाजत आहे. आधी खासदार अनिल बोंडे यांनी हे प्रकरण उघडकीस आणले. या युवकांने तीला विश्वासात घेत अमरावती येथील चंद्रविला या ट्रस्ट कडून अवैधरित्या लग्न लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. या विवाहसंस्थाला परवानगी नसताना या विवाह संस्थेने बनावट लग्न प्रमाणपत्र दिल्याचा आरोप केला आहे.

यानंतर या प्रकरणात खासदार नवनीत राणा यांनी उडी घेतली. अमरावतीत लव्ह जिहाद मोठ्या प्रमाणात सुरू असून हिंदू तरूणींचे धर्मांतरण केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. याच प्रकरणी पोलीस स्थानकात आपला फोन रेकॉर्ड केल्याच्या कारणावरून त्यांनी गोंधळ घातला होता. या तरूणीचा तात्काळ शोध घेण्याची मागणी त्यांनी केली होती.

दरम्यान, या तरूणीचा शोध लागला आहे. ही तरूणी एकटी रेल्वेने गोव्याला जात होती. अज्ञात व्यक्तीने फोन करून पोलिसांना याची माहिती दिली. यानुसार रेल्वे पोलिसांनी तिला काल रात्री दहा वाजता ताब्यात घेतले असून तिला अमरावतीकडे रवाना करण्यात आले आहे.

Exit mobile version