अमोल जावळे यांची माधव भांडारी यांच्या सोबत बंद द्वार चर्चा

भुसावळ प्रतिनिधी । भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी आपल्या दौर्‍यात अमोल हरीभाऊ जावळे यांच्यासोबत भुसावळात बंद द्वार चर्चा केली असून यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

भाजपचे प्रदेश प्रवक्ते तथा पक्षाचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी हे नुकतेच जिल्हा दौर्‍यावर आले होते. यात त्यांनी जळगावातील श्रीराम मंदिराच्या टॉक शो मध्ये भाग घेतला. यानंतर ते जिल्ह्यात मुक्कामी होते. भांडारी हे पक्षाच्या थिंक टँकमधील महत्वाचे नेते मानले जातात. या अनुषंगाने त्यांनी या दौर्‍यात काही महत्वाचे इनपुट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

या दौर्‍यात भांडारी यांनी भुसावळात अमोल हरीभाऊ जावळे यांची भेट घेतली. भाजपचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ जावळे यांच्या अकाली निधनानंतर भाजप त्यांचे पुत्र अमोल यांना पाठबळ देणार असल्याची चर्चा सुरू असली तर खुद्द अमोल जावळे वा त्यांच्या कुटुंबियांनी याबाबत आपली भूमिका अजून जाहीर केली नाही. या पार्श्‍वभूमिवर, भांडारी यांनी अमोल जावळे यांच्यासोबत सुमारे एक तास बंद द्वार चर्चा केली. यावेळी कुणीही उपस्थित नव्हता. तथापि, यातील तपशील मात्र समोर आलेला नाही.

प्रस्तुत प्रतिनिधीने याबाबत अमोल जावळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, माझ्या वडिलांचे पक्षातील बहुतांश नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध होते. या अनुषंगाने माधव भांडारी यांच्याशी माझी भेट झाली. या भेटीतील तपशील देण्यास मात्र त्यांनी नकार दिला.

अमोल जावळे हे मुंबई येथील कार्पोरेट क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी सध्या तरी कोणतीही भूमिका जाहीर केली नसतांना आता भाजपमध्ये त्यांना बळ देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Protected Content