Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावकर अमित भोळेंचा डंका : केंद्रीय अर्थ मंत्रालयात मिळाली मोठी जबाबदारी !

जळगाव-संदीप होले | मूळचे जळगावकर असणारे वरिष्ठ सनदी अधिकारी अमित गुणवंत भोळे यांची केंद्रीय वित्त मंत्रालयातील डिपार्टमेंट ऑफ रेव्हेन्यू ( राजस्व विभाग )या खात्याचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

संदीप गुणवंत भोळे हे २०१० साली केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या आयसीएएस अर्थात भारतीय नागरी लेखा सेवा परिक्षेत यश संपादन करून केंद्रीय वित्त मंत्रालयात रूजू झाले होते. त्यांनी याआधी तत्कालीन रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या सोबत काम केले होते. यानंतर त्यांची तत्कालीन राज्य मंत्री संजय धोत्रे यांचे ओएसडी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. २०२१ साली त्यांची अर्थ मंत्रालयात त्यांची उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली होती. जीएसटी आणि प्राप्तीकर यांच्यात समन्वय साधण्याची महत्वाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपविण्यात आली होती. सध्या ते याच पदावर कार्यरत होते.

आता अमित गुणवंत भोळे यांना पदोन्नती मिळून ते केंद्रीय अर्थ मंत्रालयात डायरेक्टर अर्थात संचालक बनले आहेत. याबाबतचे नोटिफिकेशन हे दिनांक २९ डिसेंबर रोजी निघाले आहे. यानुसार त्यांना दिनांक १ जानेवारीपासून पदोन्नती मिळणार आहे. अर्थात त्यांना नवीन वर्षाची मोठी भेट मिळाली आहे.

अमित गुणवंत भोळे हे बहुआयामी व्यक्तीमत्वाचे धनी आहेत. त्यांनी सन २००० साली पुणे येथील शासकीय अभियांत्रीकीतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली. यानंतर मुंबईच्या सिडनेहॅम कॉलेजातून त्यांनी मार्केटींग या विषयात पदव्युत्तर डिप्लोमा पूर्ण केला. तर शासकीय सेवेत असतांना त्यांनी २०१९ साली पुणे विद्यापीठातून अर्थशास्त्रात एम.ए. पूर्ण केले. २०१० साली केंद्रीय नागरी लेखा सेवा परिक्षेत यश संपादन करून ते वित्त मंत्रालयात रूजू झाले असून आता त्यांच्याकडे मोठी जबाबदारी आली आहे.

अमित भोळे हे अतिशय उत्तम लेखक देखील आहेत. ते आपल्या ब्लॉगवरून विविध विषयांवर नियमीत लिखाण करत असतात. तसेच त्यांना तंत्रज्ञानाची विशेष आवड असून या क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना केंद्र शासनाच्या वेब रत्न ऍवॉर्डने देखील सन्मानीत करण्यात आले आहे.

Exit mobile version