Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

मुस्लीम समाजाच्या जागेवर अंबानींचा बंगला- खडसे ( व्हिडीओ )

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । मुस्लीम समाजाच्या जमीनीवर अंबानींचा बंगला उभा असून त्यांच्यासह इतरांनी हडपलेल्या जमीनी सरकारजमा करण्याचा प्रयत्न केल्यामुळे आपण काही जणांसाठी नावडते बनल्याचे प्रतिपादन करून माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सावदा येथील मुस्लीम समाजातर्फे काल सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यासोबत एक शाम नाथाभाऊ के नाम हा मुशायर्‍याचा कार्यक्रमही झाला. या सत्काराला उत्तर देतांना एकनाथराव खडसे यांनी आपल्या मनातील खंत पुन्हा एकदा व्यक्त केली. ते म्हणाले की, मंत्रीपद महत्वाचे नाही. पदे येतात आणि जातात, मात्र आपण सातत्याने जनतेची सेवा केली आहे. जनतेची सेवा करणेच काही जणांना खटकले. यातच आपण मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्यामुळेच ही अवस्था झाल्याचे खडसे म्हणाले.

एकनाथराव खडसे यांच्यावरील राजकीय गंडांतर हे रिलायन्सचे मालक मुकेश अंबानी यांच्या बंगल्याच्या जमिनीशी संबंधीत असल्याची चर्चादेखील आधीच रंगली होती. आता खडसे यांनी या भाषणात हा मुद्दादेखील उपस्थित केला. ते म्हणाले की, एका मोठ्या माणसाची जमीन आपण सरकारजमा करून त्याचे घर जमीनदोस्त करण्याची तयारी केली होती. मात्र हा माणूस अंबानी निघाला ! त्याने अनाथाश्रमाच्या जागेवर आपले निवासस्थान उभारले होते. खरं तर ही जमीन मुस्लीम समाजाची असल्याने त्यांना मिळायला हवी होती. किमान याचे मूल्य तरी मिळायला हवे होते. हे मूल्य बाजारभावानुसार एक हजार कोटी रूपये असल्याने इतके समाजाला मिळणे अपेक्षित होते. याचप्रमाणे अनेक मोठ्या जमीन जमा करण्याचा निर्णय आपण घेतला, मात्र यामुळे आपण काही जणांसाठी नावडते झाल्याचे ते म्हणाले. आपण अनेकदा मंत्री बनलो असून पुढेदेखील बनणार आहे. तसेच मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पाहिल्यामुळे आपल्यावर राजकीय गंडांतर आल्याचे प्रतिपादन एकनाथराव खडसे यांनी केले.

पहा : एकनाथराव खडसे नेमके काय म्हणाले ते !

Exit mobile version