Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेरला वर्धमान संस्कारधाम आणि सहस्त्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्टकडून मदतीचा हात

550ece8b e733 437e 85a8 85bf90358c43

 

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यात असणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असतांना श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पाणी व चारा टंचाई साठी भरघोस मदत मिळत असल्याने याचा मोठा फायदा दुष्काळग्रस्त गावांना होणार आहे.

 

श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांच्या माध्यमातून अमळनेर तालुक्यात उदंभवलेली पाणी व चारा टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू असून गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध कामे सुरु आहेत. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील विविध गावांना टँकरद्वारे पिण्याचे पाणी पोहचविण्याचा सामावेश आहे. तसेच उन्हाळा ऋतुतील संपूर्ण चार महिने अमळनेर गोक्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानूबेन बाबूलाल शाह गोशाळा व भगवान महावीर गोशाळा शिरूड ता.अमळनेर या ठिकाणी सन 2015 -16 या काळात चारा छावण्या लावून 2 हजार गाईसाठी चाऱ्याची व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच परिसरातील नागरिकांना एकवेळेच जेवण उपलब्ध करून देण्यासाठी तीन महिन्यापर्यंत अन्न क्षेत्र सुरू करून सुमारे 2500 परिवारांना अन्न धान्याचे किट उपलब्ध करून देण्यात आले होते.

 

मानवता व जीवदया या कार्यास श्री वर्धमान संस्कारधाम मुंबई व सहस्त्रफना पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांनी खूप मोठी मदत केली होती. या वर्षीही संस्थेच्या सदस्यांनी तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली असता, त्यांना परिस्थिती खूप भयानक असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी गोपालकांशी चर्चा करून गो पालन करण्यास येणाऱ्या अडचणी समजून घेतल्यावर त्यांना तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती आढळून आली. त्यावर उपाययोजना म्हणून शिरूड व पिंपळे ता.अमळनेर येथे 1 बोरवेल मंजूर करून बोरवेलसाठी लागणारा संपूर्ण खर्च अगदी बोरवेलची मोटार, इलेक्ट्रॉनिक साहित्यासह संपूर्ण खर्चाची जबाबदारी संस्थेने स्वीकारली आहे. गेल्या अडीच महिन्यापासून तालुक्यातील दुष्काळग्रस्त 27 गावातील गायींना पिण्याच्या पाण्याची हाल व गरीब वस्ती भागातील लोकांना पिण्याच्या पाणी पुरवठा करीत आहेत. या वर्षी असणाऱ्या भीषण दुष्काळी परिस्थितीतही मदत करण्याची ग्वाही सदस्यांनी शेतकऱ्यांना दिली आहे.

 

यावेळी शिरूड ता अमळनेर येथील भगवान महावीर गोशाळा येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास वर्धमान संस्कारधाम मुंबईचे जे पी मेहता,बिपिन भाई शेठ,व अभयभाई शाह, सहस्त्रफणा चॅरिटेबल ट्रस्ट सुरतचे लेहरुभाई शहा,श्रावणीय भाई शाह यांच्यासह गोशाळेचे संचालक चेतन शहा,राजुभाई शेठ,दिलीप डेरे,गणेश वाणी,महेंद्र पाटील,अमित अहिरे,विक्रम पाटील,सतिष पाटील,सचिन धनगर,राजू पाटील यांच्या सह परिसरातील सुमारे 27 गावामधील सुमारे 1500 ते 1800 ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version