Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

प्रतापच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांची होणार पुन्हा परीक्षा ! : आंदोलनासमोर विद्यापीठ नमले

अमळनेर प्रतिनिधी | राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने छेडलेल्या आंदोलनाची दखल घेऊन महाविद्यालयाने अनुपस्थित दाखवून नापास केलेल्या विद्यार्थ्यांची फेर परीक्षा घेण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. अशा विद्यार्थ्यांच्या २३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान ऑनलाईन वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने छेडलेल्या आंदोलनाला यश आले आहे.

याबाबत वृत्त असे की, प्रताप महाविद्यालयातील टीवायबीएस्सीच्या तव्बल ७० विद्यार्थ्यांना नापास करण्यात आले होते. यातील विद्यार्थ्यांनी लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा देऊनही त्यांना नापास करण्यात आले होते. कोणत्याही तांत्रिक बाबींचा विचार न करता त्याना नापास करण्यात आल्याने आमदार अनिल पाटील यांच्या उपस्थिती विद्यापीठात बैठक घेऊन वस्तुस्थिती मांडण्यात आली होती. त्यानंतरही दखल न घेतल्याने राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेने प्रताप महाविद्यालयाला टाळे ठोकून आंदोलन केले होते. राष्ट्रवादी महानगर सचीव कुणाल पवार, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुभाष पाटील यानी विद्यापिठात प्रभारी कुलगुरु महोदयांशी चर्चा केल्या.तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस प्रदेश सचिव भुषण भदाणे ,तालुकाध्यक्ष श्रीनाथ पाटील, शहर अध्यक्ष सुनिल शिंपी, अनिरुध्द सिसोदे यांनी आंदोलन छेडले होते.मात्र आठवडा उलटूनही महाविद्यालय प्रशासनाने दखल न घेतल्याने पुन्हा सात विद्यार्थ्यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला होता.

त्यावेळी अमळनेर पोलीस स्टेशन चे पीआय राकेश परदेशी, पोलिस डॉ शरद पाटिल, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे तालुकाध्यक्ष सचिन पाटिल,इम्रान खाटीक यांनी महाविद्यालयात आंदोलन चालू असताना महाविद्यालय प्रशासना सोबत चर्चा केली. विद्यार्थी संघटनेचा रोष वाढत असल्याने विद्यापीठाने पुर्नरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे.

या संदर्भात विद्यापीठाने काढलेल्या परीपत्रकात म्हटले आहे की, राज्यातील अतिवृष्टी , पूरपरिस्थिती तसेच परीक्षार्थी कोविड रूग्ण असल्यास किंवा कुटूंबातील सदस्य कोविडग्रस्त असल्याने परीक्षार्थी विलगीकरणात असल्यामुळे कोणताही विद्यार्थी परीक्षपासून वंचित राहणार नाही , याची दक्षता घेण्यात यावी. यासाठी आवश्यकतेनुसार पुनर्परीक्षेचे आयोजन करण्यात यावे, असे शासनाचे निर्देश आहेत. तसेच विद्यार्थी संघटनांनी विनंती करून मागणी केल्याने पुर्नरपरीक्षा घेण्यात येत आहे.

त्यातही दिनांक ८ जून , २०२१ पासून ते दि .३१ जुलै , २०२१ पावेतो झालेल्या परीक्षांसाठी परीक्षा अर्ज सादर केलेल्या बहिस्थ लेखी व बहिस्थ प्रात्यक्षिक परीक्षांना अनुपस्थित किंवा अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच वरील परीक्षेस प्रविष्ठ होता येईल. इतर विद्यार्थी या परीक्षेस प्रविष्ठ झाल्यास , त्यांचे गुण ग्राह्य धरले जाणार नाहीत. ही बाब विद्यार्थी व सर्व संबंधित घटकांच्या निदर्शनास आणून देऊन परीक्षा सुरळितपणे पाडण्यासाठी विद्यापीठास सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Exit mobile version