कायमस्वरूपी नागरी सुविधा पुरवा, अथवा आंदोलन : नागरिकांचा इशारा

अमळनेर प्रतिनिधी | शहरातील धुळे रोड,आर. के. नगर,भालेराव नगर,गुरुकृपा कॉलनी,कलागुरु ड्रीमसिटी परिसरातील नागरिकांना कायमस्वरूपी नागरी सुविधा पुरवाव्यात अथवा, या भागातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा प्रांताधिकारी सीमा अहिरे यांना एका निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

वर्षानुवर्षे पावसाळी पुराच्या पाण्याने नागरिकांची व घरांची होणारी दुरावस्था कायमस्वरूपी थांबविण्यासाठी प्रशासनाने ठोस कार्यवाही करावी अन्यथा नागरिक आंदोलन करतील असे निवेदन प्रांताधिकारी सिमा अहिरे यांना देण्यात आले आहे. अमळनेर नगरपालिका हद्दीतील धुळे रोड परिसरातील आर. के .नगर, भालेराव नगर,गुरुकृपा कॉलनी,सर्वज्ञ नगर,कलागुरु ड्रीमसिटी परिसरातील नागरिकांच्या वस्तीची पडणार्‍या पावसामुळे तसेच मंगरूळ शिवारातून वाहून येणार्‍या पुराच्या लोंढ्यांमुळे वर्षानुवर्षे अत्यंत बिकट व दयनीय अवस्था झालेली आहे.

यावर कायमस्वरूपी उपाययोजना होणे गरजेचे आहे अशी मागणी यावेळी प्रांताधिकारी यांचेशी चर्चा करतांना सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे यांनी केली. तर पूर्वी धुळे रोडच्या दोन्ही बाजूने पश्चिमेकडून पूर्वेकडे नाल्याच्या प्रवाहातून नैसर्गिक उताराच्या दिशेने पाणी उतरून जायचे. सार्व.बांधकाम विभागाने सदर रस्त्याचे काम केल्यानंतर नाला लहान झालेला असून एकाच बाजूने वाहत आहे.तसेच आर के नगर,भालेराव नगर व गुरुकृपा कॉलनीतुनही नैसर्गिक नाले प्रवाहित होते मात्र कालांतराने सदरचे नाले नष्ट झाले आहेत. यामुळे ओपन प्लेस ला पाणी साचते तर आहे त्या गटारिंची पुराचे पाणी वाहून नेण्याची क्षमतेच्या नसून आर. के. नगरचा मुख्य रस्त्याचा बराचसा भाग पावसाळ्यात पाण्याखाली राहतो. एका भागातील पाणी दुसर्‍या भागात वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून ना पाईप टाकलेले आहेत तर शेतातील पुराचे येणारे पाणी वाहून जाण्यासाठी मोठे नाले कोरून कृषी उत्पन्न बाजर समितीमागील नाल्याला व पिंपळे नाल्याला जोडलेले नाहीत. लहान गटारी यासाठी कुचकामी ठरतात अशी तक्रार स्थानिक रहिवासी काशिनाथ सगरे व पी. सी. पाटिल यांनी केली.

दरम्यान, साचलेल्या पाण्यामुळे रोगराई पसरून नागरी आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे.दरवर्षी या भागातील पुराचे पाण्याच्या बातम्या येतात,नागरिकांच्या तक्रारीनंतर मुरूम माती टाकून तात्पुरती मलमपट्टी होते मात्र कायमस्वरूपी उपाययोजना होत नसल्याने स्थानिक नागरिक मोठी मानसिक व शारीरिक,आर्थिक हानीही होत असते. या प्रकरणी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाने एकत्रित कार्यवाही करून परिसरातील नैसर्गिक नाल्यांचा प्रवाह मोकळा करावा अशी कळकळीची विनंती केली असून यंदा ठोस कार्यवाही व्हावी म्हणून वेळप्रसंगी रहिवासी रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घेतील असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, नरेंद्र पाटील, काशिनाथ संगरे, गुरुकृपा कॉलनीतील प्रा लिलाधर पाटिल,आर के नगर चे पी सी पाटिल आदींनी उपस्थिती दिली.

याप्रसंगी उत्कर्ष नगर, आदर्शनगर,विठ्ठल नगर आणि धुळे रोड-पिंपळे रोड परिसरातील महिलांनीही मोठया संख्येने प्रांताधिकारी कार्यालयात सुभाष पाटील, प्रकाश पाटिल,किसन पाटील, रावसाहेब नेरपगार,आर बी पाटील यांचेसह उपस्थित होते. वर्षानुवर्षांच्या पावसाळी पाण्याच्या समस्यांबाबत संतप्त भावना व्यक्त केल्या. माजी आमदार .कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी प्रशासन व बांधकाम विभागाकडून सदर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे यावेळी नागरिकांना सांगितले.याप्रसंगी न. पा.चे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, प्रशासन अधिकारी संजय चौधरी,डिगबर वाघ,ऍड.यज्ञेश्वर पाटील, नगरसेवक शेख हाजी, बांधकाम विभागाचे अधिकारी महाजन, धुळे रोडचे ठेकेदार व इंजिनिअर प्रांताधिकारी कार्यालयात हजर होते.

Protected Content