पोकलॅन मशीन चोरणारा व विकत घेणारा अटकेत

Amalner अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शासकीय कंत्राटदाराच्या मालकीचे पोकलॅन मशिन चोरून नेणार्‍या व त्याला विकत घेणार्‍या भंगार दुकानदाराच्या मुसक्या अमळनेर पोलिसांनी आवळल्या आहेत.

याबाबत वृत्त असे की, राज नामदेव पाटील ( रा. मानराज पार्क, जळगाव) यांनी अमळनेर तालुक्यातील आंचळवाडी ते लोंढवे फाटा या रस्त्याच्या कामाचा कंत्राट घेतला होता. सध्या पावसाळा सुरू असल्याने त्यांनी काम बंद करून आपल्या मालकीचे पोकलॅन मशीन हे आंचलवाडी गावापासून जवळच रस्त्यावर ठेवले होते. दिनांक २३ ते २९ जुलैच्या दरम्यान हे मशीन कुणी तरी चोरून नेले होते. राज पाटील यांनी या प्रकरणी अमळनेर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी अमळनेर पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवून सदर पोकलॅन मशीन हे नवनीत देवाजी पाटील ( रा. बाभळगाव, ता. शिंदखेडा) याने चोरून नेल्याची माहिती मिळविली. यानुसार त्याला अटक करण्यात आली. त्याने सदर पोकलॅन हे हजरतउल्ला उर्फ राजू रहेमतुल्ला खान या धुळे येथील भंगारवाल्यास विकून टाकल्याची माहिती त्याने दिली. यानुसार या भंगारवाल्यासही अटक करण्यात आली. या प्रकरणी नवनीत पाटील याला दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आली असून आज हजरतउल्ला उर्फ राजू रहेमतुल्ला खान याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून मशिनसह एकूण १९ लाख रूपयांचे ऐवज जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखालील किशोर पाटील, सुनील हटकर, रवींद्र पाटील, दीपक माळी, कैलास शिंदे व भूषण पाटील यांच्या पथकाने केली.

Protected Content