Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अमळनेर शहरात पुन्हा तीन दिवसांचे कडक निर्बंध

अमळनेर प्रतिनिधी । कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढीस लागल्याने येथे तीन दिवसांसाठी कडक निर्बंध लादले असून यात प्रांताधिकार्‍यांनी दोन दिवस तर पालीका प्रशासनाने एक दिवसांचा जनता कर्फ्यू जाहीर केला आहे.

अमळनेर शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेत खूप जास्त रूग्णसंख्या होती. नंतर संसर्ग कमी झाल्यानंतर मध्यंतरी पुन्हा रूग्ण वाढले होते. तर अलीकडच्या काळात शहरासह तालुक्यातील कोरोना बाधीतांच्या संख्येत लक्षणीयरित्या वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

या बाबीची दखल घेऊन प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी पुन्हा शनिवार व रविवार असे दोन दिवस तर पालिकेने सोमवारी शहरात बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अमळेनर शहरात तीन दिवस कडकडीत बंद पाळला जाणार आहे. सोमवारी जनता कर्फ्यू असल्याने शहरातील आठवडे बाजार बंद राहणार आहे.

या तीन दिवसांमध्ये अमळनेर पालिका हद्दीतील सर्व बाजारापेठ, आठवडे बाजार बंद तसेच किराणा दुकाने, अनावश्यक इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भाजीपाला, फळ विक्री केंद्र बंद राहिल. शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, खासगी कार्यालय बंद तसेच हॉटेल, रेस्टॉरंट होम डिलिव्हरी वगळता बंद राहतील. तर सभा, मेळावे, बैठका, धार्मिक स्थळ, सांस्कृतिक, धार्मिक व तत्सम कार्यक्रम बंद राहिल. तर, दुध विक्री केंद्र, वैद्यकिय उपचार व सेवा, मेडिकल, अ‍ॅम्ब्युलन्स सेवा आदी अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.

या तीन दिवसांमध्ये प्रशासाने जारी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यास कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा व फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार संबंधित दोषी व्यक्ती शिक्षेस पात्र राहील असा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आलेला आहे.

Exit mobile version