Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अखेर सात्रीकरांना मिळणार रस्ता : जिल्हाधिकार्‍यांचे निर्देश !

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सात्री या गावाला पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिल्याने या गावकर्‍यांची गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या सुटणार आहे.

याबाबतचे वृत्त असे की, सात्री ता.अमळनेर येथे बुधवार दिनांक ५ रोजी उपचाराअभावी उषाबाई भिल यांचे निधन झाले. यामुळे संतप्त ग्रामस्थांनी ग्रामीण रुग्णालयात काल संताप व्यक्त केला. यावेळी प्रातांधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी सात्री ग्रामस्थांची भेट घेत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क केला होता. या पार्श्‍वभूमिवर, काल रोजी जळगाव येथे जिल्हाधिकारी यांनी बैठक घेत सात्री गावाला पर्यायी रस्त्यासाठी तात्काळ प्रातांधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करा असे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले आहेत.

यावेळी बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलींद वाघ, जिल्हा पुनर्वसन अधिकारी रविद्र भारदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, निम्न तापी प्रकल्प अधिकारी पाडळसरे उपअभियंता विलास पाटील, गिरणा पाटबंधारे उपअभियंता विलास जाधव, जिल्हा परिषद उपअभियंता श्री. पाटील, जिल्हा पुनर्वसन समिती अध्यक्ष महेंद्र बोरसे, मंडळाधिकारी एन आय कटारे, तलाठी वाल्मिक पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी सात्री गावाला नेहमी रस्ता नसल्याने संकटाचा सामना करावा लागत असल्याने पर्यायी रस्ता याविषयी तात्काळ समिती गठीत करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी दिले.

पाडळसरे तापी निम्न प्रकल्प अंतर्गत सात्री गावाचे पुनर्वसनग्रस्त असल्याने गेल्या वीस वर्षापासून या गावाला कुठलाच विकास आराखडा नाही. तर स्वातंत्र्यकाळापूर्वी पासून या गावाला तालुक्यात येण्यासाठी रस्ता नाही. यातच नदीला पूर असला तर नदी ओलांडून जाणार कसे यातच आजारी रुग्ण उपचाराअभावी मृत झाले. सर्वत्र विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना झाल्या मात्र आजही सात्री गाव यापासून कोसो दूर असल्याची खंत सात्री ग्रामस्थ यांनी व्यक्त केली आहे. प्रशासन मात्र येथील लोकांच्या जीवाशी खेळ खेळीत असल्याची भावना ही त्यांनी व्यक्त केली आहे.

याविषयी वारंवार येथील माजी सरपंच महेंद्र बोरसे यांनी पाठपुरावा करीत शासनाला जागे केले. मात्र अजून यागावात असे किती बळी जातील याची वाट शासन पाहत आहे. असेही म्हटले जात आहे. दरम्यान कालजिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या बैठकीत तात्काळ पर्यायी रस्ता विषयी निर्णय घेण्यात यावा असे सांगितले असल्याने याबाबत काय कार्यवाही होते याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version