Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

नीम येथे लंपीने दगावला बैल : पशुपालक धास्तावले

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नीम येथे लंपी या व्याधीमुळे एक बैल दगावला असून यामुळे परिसरातील पशुपालक धास्तावले आहेत.

या संदर्भातील वृत्त असे की, तालुक्यातील निम येथे लंपी या आजाराने धष्ट पुष्ट बैलाचा मृत्यू झाला असून यामुळे पशुधन पाळणारे शेतकरी बांधवांमध्ये चिंतेच वातावरण तयार झाले आहे. राज्यात सद्या पशु धणावर लंपी या आजाराने डोके वर काढले होते त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात ठिक ठिकाणी गाव पातळीवर अजूनही लसीकरण देखील केले जात आहे. काल अमळनेर तालुक्यातील शेतकरी नारायण भिवसन क्षीरसागर यांच्या मालकीचा एका बैलाचा लम्पी या आजारामुळे मृत्यू झाला. गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून हा बैल आजारी होता.

या बैलास लंपीची लक्षणे दिसून आल्यावर यावर उपचार देखील सुरू होते,परंतु गुरूवारी अखेर हा बैल दगावला.पशुवैद्यकीय अधिकारी डॉ रवी गाडे तसेच कळमसरे येथील सहाय्यक बी. एस. पाटील यांनी घटनास्थळी बैलाचे शवविच्छेदन करून पंचनामा केला. यावेळी सरपंच भगवान भिल ग्रामसेवक आर एल पाटील पोलीस पाटील उमाकांत गुर्जर आदी उपस्थित होते.

दरम्यान या आजाराने तालुक्यात याआधी दोन गुरे दगावली आहेत तर निम येथील नारायण क्षीरसागर यांचा बैल दगवल्यामुळे पशुधन पाळणार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तर, या बैल व्यतिरिक्त गावात व परिसरात कुठेही लंपी रोगाचा प्रादुर्भाव नाही असे पशुवैद्यकीय अधिकारी बी. एस. पाटील यांनी लाईव्ह ट्रेंडस न्यूजशी बोलतांना सांगितले.

Exit mobile version