Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात

अमळनेर प्रतिनिधी | तीन खुनांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये आरोपी असणार्‍या एका अट्टल गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने शिताफिने अटक केली आहे.

सूरत येथील कुख्यात गुन्हेगार कैलास आधार पाटील हा तीन गुन्ह्यांसह अनेक गंभीर गुन्ह्यांमधील प्रमुख आरोपी असून तो आजवर पोलिसांच्या हातवर तुरी देत होता. त्याच्या मागावर गुजरात पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप होता. अनेक ठिकाणी छापे मारून देखील तो हाती लागत नव्हता.

दरम्यान, हाच कैलास आधार पाटील हा अमळनेर येथे आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरिक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी सापळा रचला. दरम्यान,एलसीबीच्या पथकाला सूरत पोलिसांच्या पथकाचीही जोड मिळाली होती. याची कुणकुण कैलासला लागली. यामुळे पोलिसांना गुंगारा देण्यासाठी तो प्रेयसीची भेट टाळून पारोळा तालुक्यातील शिवारात लपून बसला होता. तर सुरत पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बकाले, अशोक महाजन, संदीप पाटील यांनी सापळा रचला.

सोमवारी पहाटे तो जंगलातून बाहेर पडून अमळनेरकडे जात असताना पथकाने त्याला शिताफीने अटक केली. कैलास याच्या विरुद्ध खूनाचे तीन गुन्हे दाखल आहेत. या शिवाय मुंबईच्या माहिम पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. सुरतच्या लिंबायक पोलिस ठाण्यात खुनासह अनेक गंभीर गुन्हे त्याच्या नावावर आहे. एलसीबीच्या पथकाने कैलास पाटील याला ताब्यात घेऊन डिंडोली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Exit mobile version