प्रांत कार्यालयासमोर शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | अवैध माती वाहतुकीने पीकाचे नुकसान होत असल्याबद्दल तक्रारीची दखल न घेतल्याने एका शेतकर्‍याने प्रांत कार्यालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. यानंतर अखेर त्याच्या तक्रारीवर कारवाईचे आश्‍वासन देण्यात आले.

याबाबतचे वृत्त असे की, अमळनेर तालुक्यातील नीम येथील सुनील शिवाजी पवार यांनी आपल्या शेतातील सहा बिघे क्षेत्रात केळी लावली आहे. त्यांच्या शेतातून वीटभट्टीसाठी माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर जाते. ट्रॅक्टरमुळे केळीवर धूळ उडून केळीची गुणवत्ता खालावते. याबाबत शेतकर्‍याने तहसीलदारांकडे तक्रार केली होती. मात्र, तहसीलदारांच्या सूचनेनुसार तलाठ्यांनी घटनास्थळी पाहणी केली, तरी माती वाहतूक करणारे ट्रॅक्टर बंद झाले नाही. त्यामुळे शेतकर्‍याने पुन्हा प्रांताधिकार्‍यांकडे तक्रार केली. तसेच प्रत्यक्ष पाहणी करावी, अशी मागणी केली होती. मात्र, प्रांतांनीही पुन्हा तलाठ्यालाच चौकशीसाठी पाठवले तरीही ट्रॅक्टरद्वारे मातीची वाहतूक बंद झाली नाही.

यामुळे केळी पीकाचे नुकसान सुरूच राहिल्याने सुनील पवार यांनी २४ रोजी दुपारी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर दोर बांधून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे यांच्यासह भूषण पाटील, एकनाथ मैराळे, महेंद्र शिरसाठ यांनी धाव घेत त्यांना यापासून परावृत्त केले. प्रांताधिकारी सीमा अहिरे यांनी तहसीलदार मिलिंद वाघ यांना बोलावून घटनास्थळी पंचनामा करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी संबंधित तलाठ्याला नोटीस देण्यात आली आहे. तर माती वाहतूक थांबविण्यात येईल असे आश्‍वासन दिल्याने अखेर सुनील पवार हे घरी परतले.

Protected Content