Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

ग्रामविकास शिक्षण मंडळात बोगस भरती-साळुंखे

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळातील कनिष्ट महाविद्यालयात बोगस भरतीच्या माध्यमातून शासनाची ५० लाखांची फसवणूक झाल्याचा आरोप संस्थेचे सदस्य अरविंद साळुंखे यांनी केला असून याबाबत त्यांनी तक्रार देखील केली आहे.

मारवड येथील ग्राम विकास शिक्षण मंडळाचे सदस्य अरविंद वासुदेव साळुंखे यांनी पत्रकार परिषद घेऊन संस्थेत भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले आहेत. ते म्हणाले की, मारवड येथील श्रीमती द्रौ. फ. साळुंखे कनिष्ठ महाविद्यालयात सन २०११मध्ये योगेश काशीनाथ पाटील यांना पायाभूत पदावर संरक्षण शास्र व भूगोल विषयाकरिता शिक्षण सेवक म्हणून नियुक्त करण्यात आले. प्रत्यक्षात २८ ऑगस्ट २०१८ रोजी शिक्षण उपसंचालकांनी संस्थेला पद भरण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्राची मागणी अमान्य केली. सन २०११पासून ते १४ पर्यंत शिक्षण उपसंचालकांनी योगेश काशिनाथ पाटील यांची पायाभूत पदास मान्यता नाकारली आहे. तर २०१३मध्ये विद्यार्थी संख्या नसल्याने अकरावीची तिसरी तुकडी रद्द केली होती.

साळुंखे पुढे म्हणाले की, सन २०१८मध्ये ही शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी योगेश पाटील यांची नेमणुकीस मान्यता नाकारली आहे. तरी देखील संस्थेने योगेश पाटील यांचा पगार काढून जवळपास ५० लाख रुपयांचे अनुदान लाटले आहे. तसेच शासनाची फसवणूक केली आहे. यासंदर्भात वारंवार माहिती अधिकारात माहिती मागितली असता प्राचार्यांनी ही माहिती दिलेली नाही असे अरविंद साळुंखे यांनी सांगितले. यामुळे या प्रकरणी आपण शिक्षण संचालक तसेच उच्च न्यायालयातही तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version