Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…तर आम्ही जशास तसे उत्तर देणार ! : भूषण भदाणे यांचा इशारा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | फलक प्रकरणात असेच सुरू राहिल्यास आपण भाजप आणि युवा मोर्चाला जशास तसे उत्तर देणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भूषण भदाणे यांनी दिला आहे.

प्रताप महाविद्यालयाच्या प्रांगणात आमदार चषक च्या निमित्ताने लागलेले फलक भाजप व युवा मोर्चा कार्यकर्त्यांनी काढण्याचा प्रयत्न केल्याने राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले आहेत. या अनुषंगाने राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष भुषण भदाणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यासंदर्भात त्यांनी म्हटले आहे की विद्यार्थी व तरुणांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन केले जाते,दोन वर्षे कोरोनामुळे मैदानी स्पर्धा बंद होत्या,आता कोणतेही निर्बंध नसल्याने खेळाला हातभार व प्रोत्साहन मिळावे, खेळाडुंच्या सुप्त गुणांना वाव मिळावा तसेच राज्यस्तरीय खेळाडूंच्या अनुभवाचा फायदा नव्या खेळाडूंना व्हावा यासाठी या स्पर्धांचे आयोजन आमदार अनिल पाटील यांच्या सहकार्याने तालुका क्रिकेट असोसिएशन ने केले आहे.

यात कोणतेही राजकारण नाही, विशेष म्हणजे या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धे मध्ये पक्षीय भेदच नसल्याने विविध पक्षांचे कार्यकर्ते खेळाडू म्हणून आनंदाने खेळत आहेत असे असताना भाजप आणि युवामोर्चा कार्यकर्त्यांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून केवळ दिशाभूल करण्यासाठी हे कृत्य केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

भूषण भदाणे यांनी पुढे नमूद केले आहे की, प्रत्यक्षात प्रताप महाविद्यालयाच्या मैदानात आतापर्यंत अनेक मैदानी खेळाच्या स्पर्धा झाल्या. मात्र कुणीही यास टार्गेट न करता उलट प्रोत्साहनच दिले आहे.मात्र खेळाबद्दल आदर नसलेल्या कार्यकर्त्यांनी दूध संघ निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागला म्हणून असे खालच्या स्तराचे राजकारण केले आहे.मात्र स्वतःला युवा म्हणविणार्‍यांनी युवांच्याच खेळाचा अनादर करणे त्वरित थांबवावे अन्यथा इतर डावपेचाच्या खेळात आम्हीही चांगलेच पारंगत आहोत. त्यांनी असले प्रकार थांबविले नाहीत, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार असा इशारा देखील भूषण भदाणे यांनी दिला आहे.

Exit mobile version