Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

१ डिसेंबर पासून सुरू होणार राज्यातील सर्व शाळा

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील सर्व शाळा १ डिसेंबर पासून सुरू करण्यात येणार असल्याचा निर्णय आज राज्य मंत्री मंडळाने घेतला. यामुळे कोविडच्या नियमांचे पालन करून पहिली ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत १ डिसेंबर पासून शाळा सुरू होण्याचा निर्णय घेण्यात आला. शाळा सुरू करत असतानाही विद्यार्थ्यांना कोविड १९ च्या सर्व नियमांचं पालन करावं लागणार आहे. विशेषतः त्याची जबाबदारी ही शिक्षकांवर अधिक असणार आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेऊन शाळा सुरू होणार असल्याची माहिती दिली. त्या म्हणाल्या की, ग्रामीण भागात पाचवी ते बारावी आणि शहरी भागात महानगरपालिका क्षेत्रातील ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू करण्यासंदर्भात मागील काळात निर्णय घेतला होता. त्यानुसार त्या शाळा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर ग्रामीण भागातील पहिली ते चौथी आणि शहरी भागात पहिली ते सातवी या शाळा सुरू करण्यासंदर्भात आम्ही आरोग्य विभागाचा अभिप्राय घेतला होता, मुख्य सचिवांचा अभिप्राय घेतला होता. तसेच टास्क फोर्सशीसुद्धा चर्चा केली होती. त्या प्रमाणे ती फाईल मुख्यमंत्र्यांना पाठवली होती. आजच्या मंत्रिमंडळातील बैठकीत मुख्यंमत्री आणि आम्ही सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेतला असल्याची माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली.

शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड म्हणाल्या की, दोन वर्षांनंतर सर्व शाळा सुरू करण्यात येत असून, त्यासंदर्भातली सर्व काळजी आम्ही घेणार आहोत. राज्याच्या शिक्षण विभागानं आता पहिलीपासून बारावीपर्यंत सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी दिलीय. प्राथमिक शाळा ऑफलाईन पद्धतीनं सुरु करण्याचा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागानं मांडला होता, त्याला आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलीय. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला राज्याच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. याशिवाय चाईल्ड टास्क फोर्सनं देखील शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

Exit mobile version