Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

चंद्रपूरच्या १४ वादग्रत गावात दुहेरी मतदान टाळण्यासाठीच्या सर्व उपाययोजनांचा उडला फज्जा

चंद्रपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | तेलंगणा व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवरील १४ गावात दुहेरी मतदान टाकण्यासाठी १३ मे रोजी आज मतदान होत आहे. या १४ गावांमध्ये ५ हजार ११७ मतदार आहे. या गावातील नागरिकांकडे दोन्ही राज्याच्या मतदानाचे ओळखपत्र आहे. मागील कित्येक वर्षांपासून ते या दोन्ही राज्यात आपला मतदानाचा हक्क बजावत आले आहेत. मात्र, यंदा दोन्ही राज्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मिळून हे दुहेरी मतदान टाळण्यासाठी विशेष उपाय काढत महत्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यासाठी चंद्रपूर आणि आसिफाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष बैठकही घेतली होती.
यात दुहेरी मतदान टाळण्यासाठी मतदारांच्या तर्जनीच्या संपूर्ण नखाला शाई लावण्याचा निर्णय घेतला होता. या शाहीच्या आधारे मतदारांची ओळख पटणार होती आणि त्यावरुन हे दुहेरी मतदान टाळले जाऊ शकते, असा तर्क दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून लावण्यात आला होता. असे असताना ही तेलंगणाच्या अधिकाऱ्यांनी नियम मोडत केल्याचे समोर आले आहे. या १४ गावामधील मतदारांनी 19 एप्रिलला चंद्रपूर लोकसभेसाठी मतदान केले होते आणि आज १३ मे रोजी तेलंगणाच्या आदीलाबाद लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होत असताना येथे देखील हे मतदार मतदान करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आज तेलंगणातील चौथ्या टप्प्याच्या निवडणुकांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी होताना दिसत नाही आहे.

Exit mobile version