Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जादा आकारणाऱ्या रुग्णालयांना अजित पवारांचा इशारा

पुणे – कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी रूग्णालयांनी दर शासनाकडून जाहीर करण्यात आले असून  कुठल्याही रूग्णालयाने जादा दर आकारू नये. असा प्रकार आढळताच संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, तसेच औषधांचाही काळाबाजार करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज  दिला. 

विधानभवन सभागृहात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी चिंचवड महानगरासह जिल्हयातील कोरोना परिस्थितीचा आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. बैठकीला राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, खासदार श्रीरंग बारणे, तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही अत्यंत महत्वाकांक्षी मोहिम सुरू केली आहे. घरोघरी जावून या मोहिमे अंतर्गत प्रत्येक कुटुंबाची आरोग्याच्या दृष्टीने तपासणी होणार आहे, या मोहिमेमुळे कोरोनाचे पूर्वनिदान होण्यास मदत होणार आहे, यातून रुग्णाला वेळेपूर्वीच उपचार मिळतील व रुग्ण लवकर बरा होईल, त्यामुळे माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिम प्रभावीपणे राबवा, असे निर्देशही त्यांनी दिले. कोरोना संसर्गाचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व स्वच्छता या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. कोरोनाला कुणीही सहजपणे घेऊ नये. या साथीवर मात करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिम यशस्वी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Exit mobile version