Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

…अन् अजितदादांनी केले मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचे स्मरण !

जळगाव, जितेंद्र कोतवाल | राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे करड्या शिस्तीचे म्हणून ओळखले जातात. अनेकदा आमदारांच्या गैरवर्तनावरून खडे बोल सुनावण्यासही ते पुढे मागे पाहत नाहीत. आज देखील त्यांनी विधानसभेत आमदारांची अशीच ‘शाळा’ घेतली. आणि याप्रसंगी त्यांनी तत्कालीन सभापती बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या विधानसभाध्यक्षपदाच्या कालखंडाचा दाखला दिला. अर्थात, यातून दिवंगत मधुकरराव चौधरी यांच्या उज्ज्वल कारकिर्दीला विधानसभेत पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेतील आमदारांच्या गैरवर्तनाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. याप्रसंगी त्यांनी आधीच्या काळातला आणि आजचा फरक देखील स्पष्ट केला. ते म्हणाले की, आधीची परिस्थिती वेगळी होती. मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष यांना मान देत होतो. आता असे काहीही होत नाही. आपण आमदार झाले म्हणून काही तरी मोठे झालो असा अनेकांचा समज असल्याबद्दल त्यांनी जोरदार टीका केली.

याप्रसंगी अजित पवार यांनी विधानसभेचे माजी अध्यक्ष दिवंगत बाळासाहेब मधुकरराव चौधरी यांच्या कार्याचे स्मरण केले. ते म्हणाले की, मधुकरराव चौधरी अध्यक्ष असताना आम्ही आमदार होतो. तेव्हा केवढा दरारा असायचा. ते उभे असतील तर आम्ही क्रॉस करायचो नाही. आता आमच्या जागेवरही येऊन बसतात. येताना अध्यक्षांना नमस्कार करायचा आणि बसायचे, जाताना नमस्कार करून जायचे. आता कोणीच ते नमस्कार करत नाही, आमदार झालो म्हणजे आपल्याला सारे कळते, असे अनेकजण वागू लागले आहेत, अशी टीका अजित पवारांनी केली.

दरम्यान, सभागृहातील शिस्तीवर भाष्य करताना त्यांनी नियमांचे पालन न करणार्‍या आमदारांना सभागृहाबाहेर चार तास उभे करण्याची शिक्षा करा असे सुचविले. जास्तच असेल तर दिवसभर उभे करा. तरच यांना शिस्त लागेल. सभागृहाचा शिष्टाचार पाळला गेला पाहिजे. विधानसभेत आमदार निवडून आल्यानंतर तो सार्वजनिक जीवनात कसा वागतो? सभागृहात कसे वर्तन करतो? यावरुन त्याची प्रतिमा ठरत असते. काही सदस्यांच्या चुकीच्या वर्तणुकीमुळे सभागृहाच्या प्रतिमेला नक्कीच तडा गेला आहे्. आता सर्वांनीच अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे, असे आवाहन अजित पवार यांनी केले.

जळगाव जिल्ह्यातील थोर नेते मधुकरराव धनाजी चौधरी यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत विविध खात्यांचे मंत्री म्हणून आपल्या कामाची अमीट छाप टाकलीच आहे. त्यांनी राज्याच्या वाटचालीत मापदंड ठरतील असे अनेक निर्णय घेतले. याचसोबत त्यांची विधानसभाध्यक्ष म्हणूनची कामगिरी देखील अतिशय लक्षणीय अशीच राहिली आहे. आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी याबाबत त्यांनी केलेल्या कामगिरीचे आणि विशेषत: बाळासाहेब चौधरी यांना आमदार किती आदर देत होते याची माहिती सभागृहाला करून दिली.

Exit mobile version