Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अजित पवार गटातील आमदाराच्या पुतण्याने दोन जणांना कारने चिरडले

पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अजित पवार यांच्या गटातील पुण्यातील खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने कारखाली दोघांना चिरडल्याची घटना घडली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी झाला आहेत. पुणे-नाशिक महामार्गावरील एकलहरे जवळ शनिवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील खेड तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याकडून अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. आमदार पुतण्याने बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना गाडीखाली चिरडले आहे. या अपघातात ओम सुनिल भालेराव याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयुर मोहिते असे आमदार मोहिते यांच्या पुतण्याचे नाव आहे. आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयुर हा पुणे-नाशिक महामार्गावरून कारने पुण्याच्या दिशेने येत होता. तो विरुद्ध दिशेने सुसाट कार चालवत होता. त्यावेळी समोरून आलेल्या दोन दुचाकीस्वारांना कारने धडक दिली. अपघात इतका भीषण होता, की दुचाकीस्वार हवेत उडाली.

त्यानंतर डोक्याला मार लागल्याने अपघातात ओम भालेराव या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एकजण गंभीर जखमी झाला. अपघातानंतर मयुर हा कारमध्येच बसून होता. त्याने जखमींना मदत देखील केली नसल्याचे सांगितले जात आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती. अपघातानंतर मृत तरुणाच्या नातेवाईकांनी मंचर पोलिस स्टेशनबाहेर मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी त्यांना शांततेचे आवाहन केले.

Exit mobile version