Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

गिरीश महाजन फेट्यानेच डोळे पुसताय ! : अजितदादांची टोलेबाजी

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | विधानसभेच्या अध्यक्षपदी राहूल नार्वेकर यांची निवड झाल्यानंतर त्यांच्या अभिनंदनपर प्रस्तावावर बोलतांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. याप्रसंगी त्यांनी आ. गिरीश महाजन यांना मारलेला टोमणा लक्षवेधी ठरला.

आज विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच विधानसभाध्यक्षपदी भाजप आणि शिंदे गटाचे उमेदवार राहूल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. त्यांना १६४ सभासदांचे भक्कम बहुमत मिळाले असून महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली. नार्वेकर यांनी विधानसभाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी गेल्या काही दिवसांमधील राजकीय घटनेवर भाष्य केले.

ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागेल असे सर्वांना वाटत असतांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाले. हाराष्ट्रासाठी तो शॉक असला तरी यामधून गिरिश महाजन तर अजूनही सावरलेले नाहीत. त्यामुळेच डोक्याला बांधलेल्या फेट्यानेच ते डोळ्यातील पाणी पुसत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला. पवार यांनी यातून भाजपमधील अस्वस्थता दाखवून दिल्याचे मानले जात आहे. दरम्यान, अजित पवार यांनी आपल्या भाषणातून नार्वेकर यांचे कौतुक करतांना त्यांच्या राजकीय कारकिर्दीला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातच आकार मिळाल्याचे आवर्जून नमूद केले. विधानसभाध्यक्षांच्या तेजस्वी परंपरेला ते न्याय देतील असा आशावाद देखील त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version