Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जळगावात अहिंसा सद्भावना शांती यात्रा उत्साहात

जळगाव –  लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महात्मा गांधीजींची १५४ वी जयंती, लाल बहादूर शास्त्रीजींची ११९ वी जयंती व चरखा जयंती निमित्ताने गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे भव्य अहिंसा सद्भावना शांती यात्रा टाॅवर चौक येथून उत्साहात काढण्यात येवून सांगता महात्मा गांधी उद्यान येथे करण्यात आली.

 

महात्मा गांधी उद्यान  येथे मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी विचार मांडताना सांगितले की, साधन, साध्य, सुचिता, वैश्विकवृत्ती, सेवाभाव हे संस्कार महात्मा गांधीजी आणि लालबहादूर शास्त्री या दोन्ही महापुरुषांचे, वैश्विकता असलेल्या विचारांवर आपण आचरण केले तर खऱ्या अर्थाने त्यांची जयंती सार्थक होईल.

याप्रसंगी व्यासपीठावर गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुदर्शन अय्यंगार, संघपती दलिचंद जैन, आमदार लता सोनवणे, स्वाती धर्माधिकारी, गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, जैन इरिगेशनचे उपाध्यक्ष अनिल जैन, महापौर जयश्री महाजन, ज्योती जैन, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पोलिस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील,  पंजाब फरीदकोट येथील बजीतसिंग तसेच सर्व धर्मगुरू जैन समणीजी सुधाजी, सुयोगनिधी, सुगमनिधीजी,  डॉ. सुयश निधीजी,  हाफिज अब्दुल रहीम नासिर पटेल, गेव दरबारी, विश्वनाथ जोशी उपस्थित होते.

 

लाल बहादूर शास्त्री टॉवरपासून या अहिंसा सद्भावना शांति यात्रेची सुरुवात झाली. याप्रसंगी मान्यवारांच्याहस्ते लाल बहादूर शास्त्री यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. अहिंसा सद्भावना शांती यात्रेस माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी हिरवी झेंडी दाखविली. यात्रेमध्ये वरील मान्यवरांसह कुलगुरू डॉ. एल. व्ही. माहेश्वरी,  डॉ. सुभाष चौधरी, जैन इरिगेशनचे सहव्यवस्थापकिय संचालक अतुल जैन, जैन परिवारातील सर्व सदस्य, शहरातील प्रशासकीय अधिकारी, मनपा नगरसेवक, लोकप्रतिनिधी,  शहरातील मान्यवर, जैन इरिगेशनमधील सहकाऱ्यांसह शहरातील अनुभूती स्कूल, ए.टी. झांबरे, सेंट टेरेसा, विवेकानंद प्रतिष्ठान, आर आर विद्यालय, प. न. लुंकड कन्या विद्यालय, या. दे. पाटील, श्रीराम विद्यालय, स्वामी समर्थ, गुळवे स्कूल, ला.ना. स्कूल, आर. आर.  विद्यालय यासह विविध शाळांमधील विद्यार्थी, शिक्षक, मोठ्या संख्येने  उपस्थित होते.

ही यात्रा लालबहादूर शास्त्री टॉवरपासून निघून, म.न.पा प्रशासकीय इमारतीचे सरदार वल्लभभाई पटेल टॉवर,  पंडीत जवाहरलाल नेहरू चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक मार्गाने महात्मा गांधी उद्यानात पोहोचली. या यात्रेत गांधीजींच्या जीवनातील बदलत जाणाऱ्या वेशभुषेच्या माध्यमातून  ‘मोहन ते महात्मा’ असा प्रवास दाखविणारा सुंदर चित्ररथ, तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने प्रतिकात्मक तिरंगा यात्रेत लक्षवेधी ठरत होता. शांती यात्रेच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी सुंदर रांगोळ्यांची सजावट करण्यात आली होती.

उद्यानातील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर यात्रेतील सर्व सहभागींसोबत गांधी उद्यानातील ओपन सभागृहात विश्व अहिंसा दिनानिमित्त  मा. न्या. सत्यरंजन धर्माधिकारी यांनी संबोधन केले. उद्योग, राजकारण, प्रशासन यासह सर्वच क्षेत्रात महात्मा गांधीजींनी सांगितलेल्या विश्वस्तवृत्ती प्रमाणे आपण सर्वांनी आचरण केले पाहिजे. कार्य हे प्रादेशिक असले तरी त्याची व्याप्ती वैश्विक असावी, हा महत्त्वाचा संस्कार महात्मा गांधीजींचा आहे. दोघंही महापुरूषांचे चरित्र आजच्या काळात देखील खूप आदर्श व मार्गदर्शक ठरणारे आहे. न्याय व संविधानातसुध्दा गांधी विचार आहे.  साधन व साध्य शुद्ध ठेवायला हवे म्हणजे खऱ्या अर्थाने आपण ट्रस्टशिप जपलेली आहे असे ठरेल, असे विचार माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुदर्शन अय्यंगार यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. हा देश सांभाळायचा असेल तर प्रत्येकांशी प्रेमाने वागावे. श्रद्धेय भवरलालजी जैन यांनी  जैन इरिगेशनच्या माध्यमातून  जय किसान हा नारा खऱ्या अर्थाने सत्यात उतरविला आहे. शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये येथे खूप मोठे कार्य होत आहे असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी भाषणामध्ये केला. आपण सर्वांनी निर्भय राहावे आणि घृणा करायची नाही. प्रेमात खूप मोठी ताकद आहे त्यामुळे आपण प्रेमाने राहावे व निर्भय बनावे असा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

जैन समणी डॉ. सुयशनिधीजी यांनी देखील उपस्थिततांशी संवाद साधला त्यांनी अहिंसा या विषयावर प्रकाश झोत टाकला.अहिंसेचे महत्त्व सांगितले. निषेधात्मक व विधायकत्मक अहिंसेचे आचरण करावे असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे मंचावर आगमनवेळीच  अशोकभाऊ व सौ. ज्योतीभाभी जैन यांच्या हस्ते सुती हाराने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. उपस्थित सर्वांनी सर्वधर्म प्रार्थना म्हटली गेली. विवेकानंद संगित विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन  तो…’ हे भजन सादर केले. मान्यरांच्या हस्ते गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या डिप्लोमा प्राप्त विद्यार्थ्यांना तसेच जीआरएफ प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये प्रावीण्य मिळविणा-या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. सुदर्शन अय्यंगार यांनी उपस्थितांना अहिंसेची शपथ दिली. प्रास्ताविक डॉ. अश्विन झाला यांनी केले. सूत्रसंचालन गिरीश कुलकर्णी यांनी केले. रिती शहा यांनी आभार मानले.

 

चरखा जयंतीनिमित्त अखंड सूतकताई

महात्मा गांधी जयंती चरखा जयंती म्हणूनही साजरी केली जाते. त्यानिमित्ताने गांधीतीर्थ मधील सहकाऱ्यांनी कार्यक्रमात पुर्णवेळ चरख्यावर सुतकताई केली. याशिवाय गांधी तीर्थ येथे दिवसभर अखंड सुतकताई करण्यात आली. यामधे गांधी तीर्थ येथे भेट देणाऱ्या अभ्यागतांनी व विद्यार्थ्यांनीही यात सहभाग घेतला.

 

Exit mobile version