Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

विदर्भवादी आंदोलन आक्रमक; पोलिसांनी घेतले ताब्यात

नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वेगळ्या विदर्भाच्या मागणीने जोर धरला आहे. नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत रस्त्यावर ठिय्या मांडला. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. यावेळी आंदोलकांनी भारत माता की जय, जय विदर्भच्या घोषणा दिल्या.

विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी अ‍ॅड. वामनराव चटप व इतर कार्यकर्ते बुधवारपासून (ता.२७) नागपूर येथील संविधान चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. तसेच अ‍ॅड. सुरेश वानखेडे व मुकेश मासुरकर यांच्या नेतृत्वात बुलडाणा जिल्हा कार्यालयासमोरसुद्धा अ‍ॅड. चटप यांच्या समर्थनार्थ बेमुदत उपोषण सुरू आहे. सतत पाच दिवसांपासून सुरू असलेल्या बेमुदत उपोषणामुळे काही कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तरीही सरकारला जाग न आल्याने आणि ३१ डिसेंबरचा अल्टिमेटम उलटल्याने नागपूरमध्ये आंदोलक आक्रमक झाले. रविवारी वणी येथे झालेल्या आंदोलनामध्ये प्रा. पुरुषोत्तम पाटील, बाळासाहेब राजूरकर, राजू पिंपलकर, देवराव धांडे, दशरथ पाटील, अजय धोबे, नामदेव जनेकर, मुक्तानंद भोंगळे, संदीप गोहोकर, होमदेव कणाके, देवा बोबडे, कला क्षीरसागर, धीरज भोयर, दिनेश रायपूरे, राकेश वराटे आदींसह असंख्य विदर्भवादी सहभागी झाले होते.

सोमवारी संविधान चौकामध्ये बराच राडा झाला. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेलं. आंदोलकांनी रस्त्यारच ठिय्या मांडला होता. वेगळ्या विदर्भाच्या मागणीचा मुद्दा पेटलेला असून सरकार हा प्रश्न कसा सोडवणार, हे पाहाणं महत्त्वाचं आहे.

Exit mobile version