Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

शाळा प्रवेशाचे वय शिथिल; शासन निर्णय जाहीर

school 1

मुंबई । आता ३१ डिसेंबरला ज्या बालकांचे वय ३ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असेल तरच प्ले ग्रुपमध्ये प्रवेश मिळणार आहे. याच तारखेला ६ वर्षे आणि त्यापेक्षा अधिक असल्यास पहिलीला प्रवेश मिळणार आहे. ही अंमलबजावणी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे. यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाने जारी केला आहे.

राज्य सरकारने शाळा प्रवेशाचे वय शिथिल केले असून आता अडीच वर्षांच्या बालकास प्ले ग्रुप/नर्सरीत तर साडेपाच वर्षे वयाच्या बालकास इयत्ता पहिलीत प्रवेश देण्यात येणार आहे. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत तीन वर्षे पूर्ण होतील त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात प्ले ग्रुप/नर्सरीत प्रवेश घेता येईल. म्हणजेच अडीच वर्षांच्या वयातच त्यांना प्रवेश मिळेल. ज्या मुलांच्या वयास ३१ डिसेंबरपर्यंत ६ वर्षे पूर्ण होणार आहेत त्यांना जून वा त्यानंतरच्या काळात इयत्ता पहिलीत प्रवेश घेता येईल. कमी वयात शाळा प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. २०२१-२२ पासून हा नियम लागू होईल.

शाळा प्रवेशासाठी बालकांच्या वयात शिथिलता आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. प्रवेशासंदर्भातील अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य उपाययोजना हाती घेण्यासाठी याचसंदर्भात शिक्षण संचालकांची (प्राथमिक) एक सदस्यीय समितीदेखील नेमण्यात आली होती. या समितीच्या शिफारशीनुसारच हा नवीन निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता मुलाला वयाच्या अडीचव्या वर्षी प्ले ग्रूप/नर्सरीला तर वयाच्या साडेपाचव्या वर्षी इयत्ता पहिलीला प्रवेश मिळू शकेल.

दरम्यान, याआधी प्रवेशासाठी बालकांच्या किमान वयामध्ये जास्तीतजास्त १५ दिवसांची शिथिलता देण्याचे अधिकार संबंधित मुख्याध्यापकांना देण्यात आले होते. आता मुख्याध्यापकांचा हा अधिकार काढून घेण्यात आला आहे.

Exit mobile version