Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात ॲड. संजय महाजन न्यायालयात !

धरणगाव- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाचेचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भगवान रामाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाबद्दल गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संजय महाजन यांनी न्यायालयात धाव घेतली असून यावर १९ रोजी सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या गत महिन्यात शिर्डी येथे झालेल्या शिबिरात पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी राम मंदिराच्या उदघाटनावर बोलताना वादग्रस्त विधान केले होते. यात त्यांनी प्रभू श्रीराम हे मांसाहारी असल्याची टिपण्णी केल्याने खळबळ उडाली होती.

याच वक्तव्यावरून आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी संजय महाजन यांनी केली आहे. आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य बेताल व अज्ञानीपणाचे आहे. त्यामुळे बहुसंख्य हिंदू लोकांच्या धार्मिक भावना दुखावलेल्या आहेत. भगवान श्री प्रभू राम हे भारतातील करोडो लोकांचे आराध्य दैवत आहेत. भगवान श्री प्रभू राम हे त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच अयोध्येतील अति भव्य दिव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. या पार्श्वभूमीवर आव्हाड यांनी जाणूनबुजून केलेले वक्तव्य हे निश्चितपणे करोडो हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे आहे. आव्हाड यांनी केलेले वक्तव्य हेतुपुरस्करपणे व हिंदूंच्या धार्मिक भावना दुखाव्यात याच उद्देशाने केलेले असल्याचे निवेदन संजय महाजन यांनी जारी केले आहे.

दरम्यान, या संदर्भात, संजय महाजन यांनी धरणगाव पोलिस आणि जळगाव पोलीस अधीक्षकांकडे तक्रारी अर्ज दिला होता. परंतू पोलिसांनी सदर अर्जावर कुठलीही कारवाई केली नाही किया कुठलाही गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आपण धरणगाव न्यायालयात १५६/३, २९५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी दाद मागत असल्याचे संजय महाजन यांनी सांगितले. या प्रकरणी पुढील सुनावणी १७ फेब्रुवारी रोजी होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version