Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लेखी आश्वासनानंतर कामगार महासंघाचे आंदोलन तूर्तास स्थगित !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने सुरु केलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाला तूर्तास स्थगित केले आहे. नियमबाह्य बदलींविषयी नेमलेल्या समितीचा जो  निर्णय येईल त्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही, असे महावितरण प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. तर समितीचा निर्णय जर प्रशासनाची पाठराखण करणारा असेल तर कामगार महासंघ त्यास कडाडून विरोध करेल व तूर्तास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा अधिक तीव्रतेने सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.

 

विभागातील नियमबाह्य प्रशासकीय व विनंती बदलीविरोधात सुरु असलेल्या बेमुदत धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी कामगार महासंघाचे वरिष्ठ पदाधिकारी सुरेशचंद्र सोनार व ज्ञानेश्वर पाटील (माउली) यांच्यासोबत कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांच्याशी चर्चा करण्यात आली. तसेच नियमबाह्य बदल्याबाबत समिती ज्या चुका झाल्याचे दर्शविल त्या परीपत्रकानुसार वरीष्ठ कार्यालयाची परवानगी घेऊन दुरुस्ती करण्यात येतील असे लेखी आश्वासन संघटनेस देण्यात आले आहे.  त्यानंतर कार्यकारी अभियंता, उपव्यवस्थापक पाडवी यांच्यासोबत संध्याकाळी आंदोलनस्थळी चर्चेस येऊन आश्वासन दिले.

 

नियमबाह्य बदलींविषयी नेमलेल्या समितीचा जो  निर्णय येईल त्यानुसार कोणत्याही कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार नाही. सर्वांना योग्य तो न्याय दिला जाईल.  समितीचा जो निर्णय येईल तो आम्हाला मान्य राहील. त्यामुळे आपण आपले बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करावे, अशी विनंती केली. त्या विनंतीस मान देऊन कामगार महासंघाचे बेमुदत धरणे आंदोलन तुर्तास स्थगित करीत आहोत असे जाहीर केले. तसेच कार्यकारी अभियंता यांना सांगीतले की, समितीचा निर्णय जर प्रशासनाची पाठराखण करणारा असेल तर कामगार  महासंघ त्यास कडाडून विरोध करेल व तूर्तास स्थगित केलेले आंदोलन पुन्हा अधिक तीव्रतेने सुरू करण्यात येइल. असेही प्रशासनाला कळविण्यात आले आहे.

Exit mobile version