Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर खडसे म्हणाले, ‘मी भाजपात नाराज नाही’

khadse thakre

मुंबई, वृत्तसंस्था | भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज (दि.१०) येथे भेट घेतली. उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी खडसे विधान भवनात पोहोचले होते. खडसे आणि ठाकरे यांच्यात सुमारे अर्धा तासाहून जास्त वेळ चर्चा झाली. याआधी खडसे यांनी शरद पवार तसेत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांचीही भेट घेतली होती. यामुळे एकनाथराव खडसे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना खडसे यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची आहे, असे स्पष्ट केले.

 

उद्धव ठाकरेंच्या भेटीमागचं कारण विचारलं असता खडसे यांनी सांगितलं की, “शरद पवार यांची मी जळगावमधील सिंचन प्रकल्पाविषयी चर्चा करण्यासाठी गेला होतो. उद्धव ठाकरेंशीही त्याबाबतच चर्चा केली. तसंच १२ तारखेला गोपीनाथ गडावर पंकजा मुंडे यांच्याकडून स्वाभिमान मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आपण आलो होतो.”

पुढे बोलताना त्यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाचा मुद्दा उपस्थित केला. गोपीनाथ मुंडे यांचं स्मारक औरंगाबाद येथे उभं राहावं, यासाठी आपण जमीन उपलब्ध करुन दिली होती. मात्र स्मारक अद्याप उभं राहू शकलेलं नाही. या स्मारकासाठी जास्त नाही ३० ते ४० कोटींचा खर्च आहे. मी उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या माध्यमातून घोषणा व्हावी अशी विनंती केली असल्याची माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे यांनी ही मागणी मान्य केली आहे. आम्ही प्राधान्याने स्मारकासाठी निधी उपलब्ध करुन देऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे. तसंच आवश्यकता असेल तर तिथला दौरा असेल त्यावेळी जागेला भेट देऊ असंही ते म्हणाले आहेत,” अशी माहितीही खडसे यांनी दिली.

यावेळी त्यांनी आपण नाराज असल्याची बातमी चुकीची असल्याचं सांगितलं. “काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यामधील नेत्यांशी जवळीक आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता आल्यास आपल्याला फायदा होईल, असं त्यांना वाटत असावं. पण याबाबत मी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही,” असेही एकनाथ खडसे यांनी यावेळी म्हटले.

Exit mobile version