जिल्ह्यातील बंधार्‍यांसाठी १२० कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता  

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाकडून जिल्ह्यातील १७३ गेटेड सिमेंट बंधार्‍यांच्या कामांसाठी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे १२० कोटी रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून याबाबतचा निर्णय जारी करण्यात आला आहे.

यात मृद व जलसंधारण विभागाच्या २०२०-२१च्या दरसुचीनुसार ० ते १०० हेक्टर जमीनीसाठी १० तालुक्यांमध्ये १५२ गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या बंधार्‍यांसाठी ९४ कोटी ८० लक्ष ६९ हजार ६४० रूपयांच्या कामांना मान्यता मिळाली आहे. तर ० ते २५० हेक्टर क्षेत्राच्या जमीनीसाठी तीन तालुक्यातील २५ गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या बंधार्‍यांसाठी २५ कोटी ०१ लक्ष ९३ हजार ७८२ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

या कामांना लवकरच प्रारंभ होणार असून यातून जिल्ह्यातील तब्बल ४००२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ८८७७ सघमी इतक्या पाण्याचा संचय होणार आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व जिल्ह्यातील आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच साठवण बंधार्‍यांसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात निधीच्या कामांना मान्यता मिळाल्याने याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्ह्यातील साठवण बंधार्‍यांच्या कामांसाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. या अनुषंगाने महाराष्ट्र जलसंधारण महामंडळातर्फे जळगाव जिल्ह्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली असून याबाबत औरंगाबाद येथील महाराष्ट्र जलसंधारण महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी दिनांक ९ मे २०२२ च्या पत्राद्वारे प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे.

याच्या अंतर्गत ० ते १०० हेक्टर जमीनीच्या क्षेत्रासाठी जिल्ह्यातील पारोळा, पाचोरा, अमळनेर, धरणगाव, भडगाव, जळगाव, यावल, रावेर, चोपडा आणि बोदवड या १० तालुक्यांमध्ये गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या १५२ बंधार्‍यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या बंधार्‍यांसाठी ९४ कोटी ८० लक्ष ६९ हजार ६४० रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे ३१८८ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ७२९७  सघमी इतका जलसंचय होणार आहे.

यासोबत ० ते २५० हेक्टर जमीनीच्या क्षेत्रासाठी जिल्ह्यातील चोपडा, धरणगाव आणि एरंडोल या तीन तालुक्यांमध्ये गेटेड सिमेंट कॉंक्रीटच्या २१ बंधार्‍यांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे. या बंधार्‍यांसाठी २५ कोटी ०१ लक्ष ९३  हजार ७८२ रूपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. यामुळे ८१४  हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून १५८० सघमी इतका जलसंचय होणार आहे. अर्थात, या एकूण १७३ साठवण बंधार्‍यांच्या माध्यमातून तब्बल ११९ कोटी  ८२ लक्ष ६३ हजार ४२२ रूपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यातील तब्बल ४००२ हेक्टर क्षेत्र ओलीताखाली येणार असून ८८७७ सघमी इतक्या पाण्याचा संचय होणार आहे.

या संदर्भात पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, आपण स्वत: व  जिल्ह्यातील आमदारांसह या कामांचा पाठपुरावा केला असून याचेच फलीत म्हणून जळगाव जिल्ह्यासाठी पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात साठवण बंधार्‍यांना मान्यता मिळाली असून याचा जिल्ह्यातील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. पाणी हा कृषीचा आत्मा असून याचा संचय हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या शेतीला समृध्दीचा आयाम प्रदान करणारा ठरेल असा आत्मविश्‍वास देखील त्यांनी व्यक्त केला.

Protected Content