Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढणार !

 

मुंबई, वृत्तसंस्था | शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे आज (दि.३०) येथे जाहीर केले. त्यांनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात बोलताना स्वत: आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. ते वरळी मतदारसंघातून निवडणूक लढणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते निवडणूक लढणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर त्यांनी स्वत: आपली उमेदवारी जाहीर करून यावर शिक्कामोर्तब केले आहे.

“आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे, मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे. संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे,” असे आदित्य ठाकरे यांनी यावेळी बोलताना सांगितले. माझ्यासाठी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिजे असं आवाहन यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांना केले. माझ्या विरोधात कोणी उमेदवार उभा राहिला तर आनंदाने त्याला राहू देत असेही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले.
“हा निर्णय माझ्या स्वप्नासाठी नाही तर जनतेसाठी घेतला आहे. आमदार, मुख्यमंत्री व्हायचं आहे म्हणून मी हा निर्णय घेतलेला नाही. जनतेचे स्वप्न साकार कऱण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. फक्त निवडणूक नाही तर लोकांच्या न्याय-हक्कांचा लढा लढण्याची हीच वेळ आहे. बेरोजगारी संपवण्याची हीच वेळ आहे,” असेही यावेळी आदित्य ठाकरेंनी सांगितले. “धर्म, जातीपातीचे सगळे भेदभाव संपवत एक नवा महाराष्ट्र निर्माण करण्याची हीच वेळ,” असल्याचेही ते म्हणाले.

Exit mobile version