Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

अधिवेशन नव्हे घरगुती कार्यक्रम – राणेंची खोचक टीका

narayan rane

नागपूर वृत्तसंस्था । शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीचे पहिलेच अधिवेशन नागपुरात सुरू आहे. त्यादरम्यान माजी मुख्यमंत्री व भाजपचे खासदार नारायण राणे येथे आले असून ते म्हणाले, ‘नव्या सरकारचे अधिवेशन हे अधिवेशन असल्यासारखे वाटत नसून एखादा घरगुती कार्यक्रम असल्यासारखे इथले वातावरण आहे,’ अशी खोचक टीका राणे यांनी केली आहे.

या अधिवेशनाबद्दल सर्वसामान्यांबरोबरच नेत्यांनाही प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दुसऱ्याच दिवशी नागपुरात दाखल झाले होते. त्यांच्या पाठोपाठ भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे तिथं पोहोचले होते. आज नारायण राणे हेही अधिवेशनस्थळी पोहोचले. राणे विधान भवनात दिसताच पत्रकारांनी त्यांच्याभोवती गराडा केला. ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाबद्दल त्यांना पत्रकारांनी मत विचारले. त्यावर राणेंनी ‘ठाकरे सरकार’ या शब्दप्रयोगाला आक्षेप घेतला. ‘हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचं नाव त्याला जोडू नका,’ असे ते म्हणाले. ‘हे अधिवशेन असल्याचे वाटतच नाही. सगळे कसं घरगुती वाटतेय. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरून होत नाहीय, असेही ते म्हणाले. सरकारची कामगिरी कशी वाटतेय असे विचारले असता, नेमके काय चाललेय याची माहिती घेऊन बोलेन,’ असेही ते म्हणाले. राणे यांची आज दुपारी पत्रकार परिषद होणार आहे. त्यात ते काय बोलतात याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.

Exit mobile version